पुण्यातील चार एथिकल हॅकर्सकडून ‘भारत पे’चे संकेतस्थळ हॅक; प्रणालीतील त्रुटींची दखल घेत कंपनीकडून तातडीने दुरुस्ती

क्यूआर कोडच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारत पे या कंपनीचे संकेतस्थळ पुण्यातील चार एथिकल हॅकर तरुणांनी हॅक केले.

पुणे : क्यूआर कोडच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारत पे या कंपनीचे संकेतस्थळ पुण्यातील चार एथिकल हॅकर तरुणांनी हॅक केले. तसेच संकेतस्थळावरील सुरक्षिततेसंदर्भात राहिलेल्या त्रुटी कंपनीला दाखवून दिल्या. या त्रुटींची कंपनीकडूनही गांभीर्याने दखल घेऊन संकेतस्थळामध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात आली.

पुण्यातील श्रेयस गुजर, ओंकार दत्ता, शारूक खान आणि अम्रित साहू हे तरूण एथिकल हॅकर आहेत. या चौघांपैकी श्रेयस आणि ओंकार हे सर्टिफाईड एथिकल हॅकर आहेत. संगणकावर किंवा संगणकीय जाळय़ावर साठवून ठेवलेली महत्त्वपूर्ण माहिती नैतिकतेने किंवा परवानगीने पाहणे किंवा बदलणे याला एथिकल हॅकिंग म्हणतात. संगणकीय प्रणाली, संगणकीय जाळय़ातील धोके किंवा त्रुटींचे निराकरण करून त्यांची सुरक्षितता वाढवणे हा एथिकल हँकिंगचा हेतू असतो. श्रेयस गुजरने या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही संकेतस्थळ हॅक करून त्यातील त्रुटी विद्यापीठाला दाखवून दिल्या होत्या. त्यानंतर आता मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या भारत पेसारख्या नामांकित कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून प्रणालीतील त्रुटींची माहिती ट्विटद्वारे कंपनीला कळवली. त्यानंतर कंपनीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन या तरुणांना संपर्क साधत लगेचच प्रणालीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती केली.

याबाबत श्रेयस गुजरने ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. भारत पेच्या संकेतस्थळावर देशभभरातील सत्तर लाखांहून अधिक दुकानदारांची खाती आहेत. त्या खात्यात त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती साठवली जाते. दुकानदार त्या खात्यावरून त्यांच्या व्यवहारांची माहिती घेऊ शकतात. या प्रणालीचा अभ्यास केला असता त्यातील ‘ऑथेंटिकेशन सिस्टिम’मध्ये त्रुटी आढळल्या. या त्रुटीमुळे गैरप्रकार होऊ शकला असता. त्यामुळे कंपनीने दुरुस्ती केली आहे.

आभाराचा ईमेल आणि पारितोषिक

संकेतस्थळ आणि प्रणालीतील त्रुटी दाखवल्याबाबत  कंपनीचे मुख्य व्यापार अधिकारी विजय अगरवाल यांनी आभार मानणारा ई मेल या तरुणांना पाठवला. तसेच पारितोषिक देऊन गौरवही केला. 

सायबर सुरक्षेच्या कडक कायद्यांची गरज

सायबर सुरक्षा, विदा सुरक्षा या संदर्भात आपल्याकडे कडक कायद्यांची उणीव आहे. ऑनलाइन माध्यमे, डिजिटल व्यवहार वाढत असताना आता वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांची आणि जनजागृतीची तीव्रतेने गरज आहे, असेही श्रेयसने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bharat pay website hacked four ethical hackers pune prompt repair company noting errors ysh

Next Story
मोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात
फोटो गॅलरी