मॉस्को :रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ निरंकुश सत्तेला हादरा देणारे वॅग्नर गटाचे बंड अल्पजीवी ठरले असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. रशिया सरकारशी झालेल्या तडजोडीनंतर बेलारूसमध्ये हद्दपार झालेले या गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून ते बेलारूसमध्ये गेल्याचेही अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुतिन यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीस शनिवारी वॅग्नर ग्रूप या खासगी सैन्याच्या बंडामुळे प्रथमच देशांतर्गत मोठे आव्हान निर्माण झाले. वॅग्नरच्या सैनिकांनी काही लष्करी तळ ताब्यात घेतल्यानंतर प्रिगोझिन यांच्या आदेशावरून राजधानी मॉस्कोकडे कूच केली होती. नंतर बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीनंतर प्रिगोझिन यांनी रशियाचे सत्ताकेंद्र असलेल्या क्रेमलिनशी वाटाघाटी करून आपल्या सैनिकांना पुन्हा तळावर परतण्याचे आदेश दिले होते. रशियात प्रिगोझिन यांच्यावर खटला न चालविण्याच्या बदल्यात त्यांनी बेलारूसमध्ये हद्दपार व्हावे, असे वाटाघाटींमध्ये ठरल्याची माहिती क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी रात्री उशिरा दिली. बंडात सहभागी झालेल्या सैनिकांविरुद्धही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. मात्र, त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून कराराबद्ध होण्याचा प्रस्ताव दिला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले. यासंदर्भात वॅग्नर गटाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हद्दपारीनंतर रविवारी संध्याकाळपर्यंत प्रिगोझिन बेलारूसला पोहोचल्याचे कोणतेही वृत्त नव्हते. प्रिगोझिन यांना विजनवासात कोणती भूमिका दिली जाणार, तसेच वॅग्नेर समूहाच्या सैनिकांची तुकडी त्यांच्यासह असेल का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

‘रक्तपात टाळण्यासाठी माघार’

रशियन बांधवांचा रक्तपात टाळण्यासाठी माघार घेतल्याचा दावा प्रिगोझिन यांनी केला आहे.  त्यांच्या खासगी सैन्यात २५ हजार सैनिक होते आणि त्यांनी आत्मसमर्पण न करण्याचा निर्णय घेतला होता. आपला देश भ्रष्टाचार, कपट आणि नोकरशाहीच्या सावलीत राहू इच्छित नाही, असे ‘टेलिग्राम’वर जारी ध्वनिफितीद्वारे दिलेल्या संदेशात प्रिगोझिन म्हणाले.

रशियाच्या मर्यादा उघड

या अल्पकालीन बंडाने रशियन लष्करातील असुरक्षा आणि मर्यादा उघड केल्या. प्रिगोझिनच्या नेतृत्वाखालील वॅग्नर गटाचे सैनिक रशियन शहरात रोस्तोव्ह-ऑन-डॉनमधून कोणत्याही प्रतिकाराविना बिनदिक्कतपणे पुढे गेले. त्यांचे सैनिक मॉस्कोपासून अवघ्या २०० किलोमीटरवर पोहोचले होते. मात्र रशियन सैन्य राजधानीचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाल्यानंतर मोठय़ा रक्तपाताची शक्यता निर्माण झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big shock to vladimir putin wagner group rebellion exposes putins weakness zws