पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेत आल्यास राज्याच्या पंचायती राज व्यवस्थेतील प्रतिनिधींचे भत्ते दुप्पट करण्याचे, तसेच ५० लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिले जाईल, असे आश्वासन राजद नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी दिले.
पंचायती राज व्यवस्थेत प्रशासनाचे तीन स्तर असून त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. अध्यक्षांना ‘मुखिया’ (ग्रामपंचायत), ‘प्रमुख’ (पंचायत समिती) आणि ‘अध्यक्ष’ (जिल्हा परिषद) म्हणून ओळखले जाते.
यापूर्वी जूनमध्ये नितीश कुमार सरकारने राज्यातील पंचायती राज संस्थांच्या अधिकाऱ्यांचे आणि वॉर्ड सदस्यांचे भत्ते आणि इतर फायदे वाढवले होते.
यापूर्वी, यादव यांनी इंडिया आघाडी सत्तेत आल्यास विविध राज्य सरकारी विभागांमध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना ‘कायमस्वरूपी कर्मचारी’ दर्जा देण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी बिहारमधील प्रत्येक कुटुंबाला एका सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते.
आघाडी सत्तेत आली तर बिहारच्या पंचायती राज व्यवस्थेतील प्रतिनिधींचा मासिक भत्ता दुप्पट केला जाईल. आम्ही राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) वितरकांसाठी प्रति क्विंटल ‘मार्जिन मनी’मध्येदेखील लक्षणीय वाढ करू. याव्यतिरिक्त, राज्यातील न्हावी, कुंभार आणि सुतारांना ५ लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देऊ. – तेजस्वी यादव, नेते, राजद
जनतेला हे जाणून घ्यायचे आहे की तेजस्वी यादव यांनी आमदारकीच्या १० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत १३.४१ कोटी रुपयांची मालमत्ता कशी जमवली? त्यांची सर्व आश्वासने पोकळ असल्याचे जनतेलाही माहीत आहे. भ्रष्टाचार आणि इतर गुन्ह्यांसाठी त्यांच्याविरुद्ध २७ गुन्हे दाखल आहेत. बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात त्यांच्याविरुद्ध खटले प्रलंबित आहेत. – नीरज कुमार, प्रवक्ते, जदयू
