चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ या कालावधीत भाजपाला तब्बल ८०० कोटी रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपानं निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी भाजपानं निवडणूक आयोगाला यासंदर्भातील माहिती दिली आहे. भाजपाला यावर्षी धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिकची देणगी मिळाली आहे. तर त्यांच्या तुलनेत काँग्रेसला १४६ कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे.

टाटा समुहाच्या ‘प्रोगरेसिव्ह इलेक्ट्रोल ट्रस्ट’नं भाजपाला सर्वाधिक देणगी दिली आहे. ‘प्रोगरेसिव्ह इलेक्ट्रोल ट्रस्ट’कडून भाजपाला तब्बल ३५६ कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे ट्रस्ट ‘द प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट’नं भाजपाला ६७ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. तर याच ट्रस्टनं काँग्रेसलाही ३९ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. या ट्रस्टला भारती ग्रुप, हीरो मोटोकॉर्प, जुबिलियेंट फूडवर्क्स, ओरिअंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स यांसारख्या मोठ्या समुहांची साथ लाभली आहे.

काँग्रेसला मिळालेल्या १४६ कोटी रूपयांच्या देणगीतून ९८ कोटी रूपयांची देणगी इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळाले आहेत. तर भाजपाला मिळालेल्या ८०० कोटी रूपयांच्या देणगीपैकी ४७० कोटी रूपये इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळाले आहेत. आदित्य बिर्ला समुहाच्या इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपाला २८ कोटी रूपये आणि काँग्रेसला २ कोटी रूपयांची देणगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ट्रिम्फ इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपाला ५ कोटी, हार्मोनी ग्रुपमं १० कोटी, जनहित इलेक्टोरल ट्रस्ट आणि न्यू डेमोक्रेटिक इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपाला २.५ कोटी रूपयांची देणगी दिली आहे.

कोणत्या समुहाकडून किती देणगी?

हीरो समूहः
१२ कोटी
आयटीसीः २३ कोटी
निरमाः ५ कोटी
प्रगती समूहः ३.२५ कोटी
मायक्रो लॅब्सः ३ कोटी
बीजी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजीः १५ कोटी
आदि एंटरप्रायझेस : १० कोटी
लोढा डेव्हलपर्सः ४ कोटी
मॉडर्न रोड मेकर्सः १५ कोटी
जेवी होल्डिंग्सः ५ कोटी
सोम डिस्टिलरीजः ४.२५ कोटी