नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत राजकीय संस्कृती बदलली,’ असे गुणगान गायले. मोदी आणखी चार वर्षांचा कार्यकाळच नव्हे तर, २०२९ मध्ये चौथ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून तोही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा आशावाद नड्डा यांनी पत्रकार परिषदेत मांडला.

पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत नड्डांनी, पंतप्रधान मोदी कुठल्याही आव्हानाला थेट सामोरे जातात, असा दावा केला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात राहुल गांधींनी आक्षेपांचे अनेक प्रश्न मोदी सरकारला विचारले आहेत. केंद्र सरकार व भाजपवर राहुल सातत्याने आरोप करत असल्याच्या मुद्द्यावर नड्डा म्हणाले की, ‘‘राहुल गांधी यांचा हेतू नेमका काय हे समजून घेणे अत्यंत कठीण आहे. त्यांना देव सद्बुध्दी देवो!… ते सर्वपक्षीय बैठकीत, ‘मी देशाबरोबर आहे’ असे म्हणतात. पण,बाहेर जाऊन बिनबुडाचे प्रश्न उपस्थित करतात. ते बेजबाबदार विरोधी पक्षनेते आहेत, एवढेच मी म्हणू शकतो.’’

निवडणूक आयोगावरील आरोप बेजबाबदार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातही राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यावर, असे आरोप म्हणजे क्रिकेटचा सामना हरल्यानंतर पंचांना दोष देण्याजोगे आहे. जिंकलो तर आपले कर्तृत्व, हरलो तर दुसरा जबाबदार असा दोषारोप करून कसे चालेल? राहुल वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये वेगवेगळे आकडे देत आहेत. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेवर बेजबाबदारपणे आरोप करणे योग्य नाही, अशी टीका नड्डा यांनी केली.

अनुनयाचे, भ्रष्टाचाराचे, घराणेशाहीचे राजकारण बदलून मोदींनी विकासाचे, कार्यक्षमतेला प्राधान्य देणारी शासन व प्रशासन व्यवस्था आणली. नक्षलवाद आदी देशांतर्गत आव्हानांनाही सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक बंदी आदी अनेक महत्त्वाचे निर्णय ११ वर्षांत घेण्यात आले. – जे पी नड्डा, भाजपाध्यक्ष

काँग्रेसकडून प्रगतीपुस्तक प्रसिद्ध

दरम्यान, मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने सोमवारी प्रगतीपुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये कुंठित झालेला विकासदर, वाढती भूकसमस्या आणि पूर्ण न केलेल्या आश्वासनांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरून ‘११ साल, झुठे विकास के वादे’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली.

मोदी पळून का जातात? काँग्रेस

मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवी होती. पण, मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पुढे केले, अशी खरमरीत टीका जयराम रमेश यांनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकदरम्यान मोदींनी दिलेल्या मुलाखती म्हणजे त्यांनीच लिहिलेली पटकथा होती, ज्यामध्ये त्यांनी स्वत:ला अजैविक म्हणजे दैवी असल्याचा दावा केला होता, असा टोमणा रमेश यांनी मारला.