काळ्या पैशांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने छेडलेल्या युद्धाला सुरुवात झाली आहे. मोदी यांच्या आदेशानंतर सरकारने काळ्या पैशांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी देशभरात एकाच वेळी छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, भुवनेश्वर आणि कोलकाता या बड्या शहरांमधील ३०० हून अधिक कंपन्यांवर छापेमारी केली आहे. काळे धन पांढरे केल्याचा या कंपन्यांवर संशय आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी छापे मारले. काळ्याचा पांढरा पैसा करणाऱ्या बोगस कंपन्यांभोवती कारवाईचा फास आवळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे ३०० कंपन्या ईडीच्या निशाण्यावर आहेत. या कंपन्यांनी शंभर कोटींहून अधिक काळा पैसा पांढरा केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ईडीचे अधिकारी कंपन्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सुमारे तीनशे कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे. देशभरातील या ३०० कंपन्यांवर छापे मारून चौकशी करण्यात येत आहे. सुरुवातीला या कंपन्यांची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतरच ईडीने कारवाईचे पुढील पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांच्या माध्यमातूनच काळेधन पांढरे करण्याचा उद्योग सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. देशातील १६ राज्यांमधील १०० हून अधिक शहरांमध्ये ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, चंदीगड, पाटणा, रांची, अहमदाबाद, ओडिशा, बेंगळुरू या मोठ्या शहरांसह इतर शहरांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागली आहेत. त्यात १०० कोटींहून अधिक काळा पैसा पांढरा केल्याचे पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. या पुराव्यांमधून अनेक बडे उद्योजक आणि राजकीय नेत्यांचे हात ‘काळे’ झाल्याचे उघड झाले आहे, असेही सांगण्यात येत आहे.