Man Broke-up with Woman Due to Hotel WiFi: आजकाल नात्यांमधलं गांभीर्य हरवत चालल्याची चर्चा आपण अनेकदा ऐकतो. अगदी क्षुल्लक कारणावरूनही नाती तुटल्याचे दावे केले जातात. पण अशी एक खरीखुरी घटनाच समोर आली आहे. प्रेयसीसोबत फिरायला गेलेल्या एका प्रियकरानं त्या तरुणीच्या मोबाईलवर हॉटेलचं वायफाय विनापासवर्ड कनेक्ट झाल्यावरून नातं तोडल्याचा प्रकार घडला आहे. आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी या तरुणीला अनेक खटाटोप करावे लागले. पण तरुणाच्या डोक्यात हॉटेलचं वायफाय फिट्ट बसलं होतं. शेवटी चक्क एका वृत्तवाहिनीवर जाऊन या तरुणीनं आपला खरेपणा सिद्ध केला!

नेमका प्रकार काय आहे?

हा सगळा प्रकार चीनच्या चोंगकिंग भागात घडला. साऊथ चायना मॉर्निंगच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. सदर तरुणी तिच्या प्रियकराबरोबर चोंगकिंग भागात फिरण्यासाठी आली असता त्यांनी एका हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिथे चेक-इन करण्यासाठी दोघांची ओळखपत्रं द्यावी लागली. पण तरुणीनं सोबत ओळखपत्र ठेवलं नसल्यामुळे ते ऑनलाईन दाखवावं असा विचार करून तरुणीनं मोबाईल उघडला. पण इंटरनेट रेंज नसल्यामुळे हॉटेलच्या वायफायचा वापर करायचं तिनं ठरवलं.

आपल्या प्रियकराला तिनं याची कल्पना दिली आणि मोबाईलवर वायफाय सुरू केलं. पण कोणताही पासवर्ड न टाकता तरुणीचा मोबाईल फोन लागलीच हॉटेलच्या वायफायला कनेक्ट झाला. तरुणाच्या डोक्यात संशयाचा भुंगा शिरण्यासाठी एवढी बाब पुरेशी ठरली. आपली प्रेयसी भलत्याच कुणासोबततरी या हॉटेलमध्ये याआधीही येऊन गेली आहे, अशा संशयाचं भूत तरुणाच्या डोक्यात शिरलं.

वायफाय कनेक्ट, नातं ‘डिसकनेक्ट’!

तरुणीनं आपण धोका दिला नसल्याचं प्रियकराला पटवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण तरुण काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी प्रेयसीवर फसवल्याचा आरोप करून तरुणानं तिच्याशी ब्रेक-अप केलं. तरुणीनं त्यांच्या मित्रमंडळींनाही जेव्हा ही बाब सांगितली, तेव्हा तेही ब्रेक-अपचं कारण ऐकून अवाक् झाले.

आपल्यावरचा हा बिनबुडाचा आरोप पुसून टाकण्याचा तरुणीनं चंग बांधला. तिनं यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याच भागात तिनं पूर्वी कधीकाळी नोकरी केलेलं एक हॉटेल असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्या हॉटेलमधल्या वायफायचं नाव आणि त्याचा पासवर्डही याच हॉटेलमधल्या वायफाय व पासवर्डसारखाच असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपण इथे नोकरी करत असताना मोबाईल फोनवर वायफाय रजिस्टर केलं असावं आणि नंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये तेच नाव आणि पासवर्ड असल्यामुळे वायफाय थेट कनेक्ट झाल्याचंही तिला उमगलं.

शेवटी वृत्तवाहिनीकडे गेली तरुणी!

हा सगळा प्रकार तरुणीनं आपल्या प्रियकराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रियकराचं काही समाधान झालं नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून अखेर तरुणीनं एका स्थानिक वृत्तवाहिनीची मदत घेतली. या वृत्तवाहिनीच्या माध्यम प्रतिनिधीनं कॅमेऱ्यासह तिच्या आधीच्या हॉटेलमध्ये शूटिंग केलं. तिथे त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये तिथलं वायफाय कनेक्ट केलं. त्यानंतर सदर जोडपं राहायला गेलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिथे वायफाय सुरू करताच ते थेट कनेक्ट झालं. त्यामुळे तरुणीची यात काहीही चूक नसल्याचं स्पष्ट झालं.

पण यावेळी मात्र तरुणीनं प्रियकराशी पुन्हा जुळवून घ्यायला तयार नसल्याचं निक्षून सांगितलं. “जेव्हा मला त्याची गरज होती, तेव्हा त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला अशा कुणाहीकडे परत जायचं नाही, जो कोणत्याही तथ्यांशिवाय थेट निष्कर्षापर्यंत पोहोचतो”, अशी प्रतिक्रिया या तरुणीनं दिली. या प्रकरणामुळे एक साधं वायफायदेखील एका जोडप्याचं ब्रेक-अप होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं, हेच सिद्ध झाल्याच्या भावना इतर संबंधितांनी व्यक्त केल्या.