मुंबई : सध्या भारतभेटीवर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओला भेट दिली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेअंती भारतातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘यशराज फिल्म्स प्रॉडक्शन’ने ब्रिटनशी करार केला. त्यानुसार, पुढच्या वर्षी यशराजच्या तीन मोठ्या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये करण्यात येणार आहे. या कराराच्या निमित्ताने बॉलीवूड पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये परतले आहे, अशी भावना कीर स्टार्मर यांनी व्यक्त केली.

स्टार्मर यांनी बुधवारी अंधेरीतील यशराज फिल्म स्टुडिओला भेट दिली. २०२६च्या सुरूवातीलाच यशराज फिल्म्स त्यांच्या आगामी तीन चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये करणार असून त्यानिमित्ताने अब्जावधी पौंडांची उलाढाल आणि तीन हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कीर स्टार्मर यांनी दिली. स्टार्मर यांच्याबरोबर आलेल्या शिष्टमंडळात ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’, ‘ब्रिटिश फिल्म कमिशन’, ‘पाइनवुड स्टुडिओ’, ‘एलस्ट्री स्टुडिओ’ आणि ‘सिव्हिक स्टुडिओ’ अशा ब्रिटनमधील काही नामांकित चित्रपट कंपन्यांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.

स्टार्मर यांनी ब्रिटनमधील चित्रपट व्यवसायाची उलाढालही मोठी असल्याची माहिती दिली. चित्रपट व्यवसायातून दरवर्षी ब्रिटनमध्ये १२ अब्ज पौंडांची उलाढाल होते, शिवाय ९० हजार रोजगार या व्यवसायातून देशभरात निर्माण झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘बॉलिवूड ब्रिटनमध्ये परतले असून यशराज फिल्म्सशी झालेल्या करारातून पुन्हा एकदा रोजगार, गुंतवणूकीच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच, चित्रिकरणासाठी उत्तम स्थळ म्हणून ब्रिटनचे नाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर येणार आहे’, असे यावेळी किर स्टार्मर यांनी सांगितले.

‘यशराज’साठी विशेष महत्त्व

यशराज फिल्म्स्साठी ब्रिटनचे नेहमीच खास स्थान राहिले आहे. यशराज फिल्म्सचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट ब्रिटनमध्ये चित्रित झाला होता. आज या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा यशराज फिल्म्स आणि ब्रिटनमध्ये चित्रीकरण कराराच्या निमित्ताने संबंध दृढ होत आहेत, असे यशराज फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांनी सांगितले. सध्या यशराजच्या वतीने ब्रिटनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटावर आधारित ‘कम फॉल इन लव्ह’ या संगीतमय नाटकाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहितीही विधानी यांनी दिली.