ह्यूस्टन : अमेरिकेमध्ये टेक्सास येथे भारतीय वंशाच्या हॉटेलच्या व्यवस्थापकाचा त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच शिरच्छेद करण्यात आला. वॉशिंग मशीनवरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली. आरोपीला अटक करण्यात आली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, की चंद्रा मौली नगमाल्ले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मूळचे कर्नाटक येथील आहेत. वॉशिंग मशीन तुटण्यावरून त्यांचा त्यांचे सहकारी योर्दानिस कोबो-मार्टिनेझ (वय ३७) यांच्याशी वाद झाला होता.
कोबो यांच्याशी थेट संवाद साधण्याऐवजी अन्य एका व्यक्तीला आपले बोलणे भाषांतर करून त्याला सांग, असे चंद्रा यांनी म्हटल्याने कोबो याचा संताप अनावर झाला. एका मोठ्या सुऱ्याने कोबोने चंद्रा यांच्यावर हल्ला केला. चंद्रा घाबरून हॉटेलच्या कार्यालयाजवळ गेले. त्या ठिकाणी त्यांची पत्नी आणि १८ वर्षांचा मुलगा होता. पत्नी आणि मुलाने या दोघांच्या भांडणात मध्यस्थी केली. पण, कोबोने या दोघांना बाजूला केले आणि चंद्रा यांना मारणे सुरू ठेवले. शीर धडापासून वेगळे होत नाही, तोपर्यंत तो मारत राहिला. आरोपीने धडावेगळे केलेल्या शिराला लाथा मारल्या. त्यानंतर ते हातात घेऊन मोठ्या कचराकुंडीत टाकले. हा गुन्हा कल्पनेपलीकडचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
कोबो दोषी सिद्ध झाला, तर त्याला कुठल्याही पॅरोलशिवाय आजीवन कारावास अथवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी त्याला फ्लोरिडा येथे चोरीच्या गुन्ह्यात आणि मुलाशी असभ्य कृत्य आणि हल्ला करण्यावरून दोनदा अटक झाली होती.
या घटनेचा ह्यूस्टन येथील भारताच्या वकिलातीने निषेध केला आहे. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू असल्याचे वकिलातीने म्हटले आहे. चंद्रा यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून, आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे. भारताचे महावाणिज्यदूत डी. सी. मंजुनाथ यांनी ही माहिती दिली. चंद्रा यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी त्यांचे मित्र निधी गोळा करीत असून, आतापर्यंत ५० हजारांहून अधिक डॉलरचा निधी गोळा करण्यात आला आहे.