राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरूवारी दिल्लीत आणखी एका आगीच्या घटनेनं हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशामक दलाच्या जवानांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
पिरागढमधील उद्योगनगर भागात असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीला पहाटे आग लागली. या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर जवानांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आग विझवत असताना अचानक इमारतीत स्फोट झाला. या हादऱ्यानं इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अग्निशामक दलाच्या जवानांसह अनेक गाडले गेले आहेत.
Delhi: A fire broke out at a factory in Peeragarhi early morning today. During rescue operations a blast occurred, causing the collapse of the factory building in which several people, including fire brigade personnel are still trapped. Rescue operations underway. pic.twitter.com/q5uGdxkOUL
— ANI (@ANI) January 2, 2020
अग्निशामक दलाच्या कार्यालयात सकाळी साडेचार वाजता उद्योगनगरमधील एका कारखान्याला आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर सात बंब घटनास्थळी रवाना झाले. आग विझवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला आणि इमारत कोसळली. यात जवानांसह अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे, अशी माहिती दिल्ली अग्निशामक दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच आपण संपूर्ण घटनेवर नजर ठेवून असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
