Bus Falls Into Alakananda River उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये एक बस अलकनंदा नदीत कोसळून अपघात झाला आहे. या बसमध्ये १८ प्रवासी बसले होते. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं आहे तर ११ प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस, एसडीआरएफचं पथक यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. ११ बेपत्ता प्रवाशांना शोधण्यात येतं आहे. नेमकं काय झालं याचा तपासही केला जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून रुद्रप्रयाग, केदारनाथ या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीचा प्रवाहही वेगाने वाहतो आहे. बस याच नदीत कोसळली आहे. त्यामुळे हे प्रवासी या प्रवाहासह वाहून गेले आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती ANI ने दिली आहे.
बसचा अपघात नेमका कसा झाला?
समोर आलेल्या माहितीनुसार १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK 08, PA 7444 या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आला होता. याच बसचा अपघात झाला आहे.
विभागीय आयुक्तांनी काय सांगितलं?
१८ प्रवाशांना घेऊन बस चालली होती. ही बस अलकनंदा नदीत कोसळली आणि अपघात झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु झालं आहे. एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध पोलीस आणि एसडीआरएफकडून घेतला जातो आहे. पोलीसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली. या घटनेत जे प्रवासी बेपत्ता आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत.