हिंदूंनी येत्या धनत्रयोदशीला धातूची भांडी आणि सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी तलवारी खरेदी कराव्यात, असा वादग्रस्त सल्ला उत्तर प्रदेशातील एका भाजपा नेत्याने दिला आहे. येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टाकडून अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार आहे, या पार्श्वभूमीवर या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील देवबंद या शहराचे भाजपा अध्यक्ष गजराज राणा यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी हे विधान केले आहे. राणा यांनी म्हटले की, “रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी येत्या काही दिवसांमध्ये निकाल येणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, राम मंदिराच्या बाजूनेच हा निकाल येईल. त्यामुळे या काळात वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझा सल्ला आहे की, हिंदू समाजाने या धनत्रयोदशीला धातूच्या भांडी आणि सोने-चांदी खरेदी करण्याऐवजी लोखंडी तलवारी खरेदी कराव्यात. कारण, अशी वेळ आलीच तर या तलवारींचा वापर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी करता येईल.” दरम्यान, आपण हे विधान कोणत्याही विशिष्ट समाजाविरोधात केलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
“आपल्या परंपरांनुसार, आपण शस्त्रांची पुजा करतो आणि आपल्या देव-देवतांनी देखील परिस्थितीनुसार अशा शस्त्रांचा वापर केला आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात मी हे आवाहन केले आहे. त्यामुळे याचा आणखी वेगळा अर्थ घेतला जाऊ नये,” असेही राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपाने मात्र त्यांच्या या विधानावर सावध पवित्र घेतला आहे.
यावर उत्तर प्रदेशातील भाजपाचे प्रवक्ते चंद्रमोहन म्हणाले, “राणा यांनी असे विधान केले असेल तर भाजपाचा त्यांना पाठींबा नाही. त्यांनी जे काही म्हटलंय ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाच्या नेत्यांना याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कायद्याच्या चौकटीच कोणतेही वक्तव्य करावे. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही.”
राणा हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. देवबंद येथील ‘दारुल उलूम’ ही मुस्लिमांची संघटना दशतवादाशी समानार्थी आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते. त्याचबरोबर मक्केच्या मशिदीमध्ये शिवलिंग असून कधी काळी तिथे हिंदूंचे वास्तव्य होते, असेही त्यांनी म्हटले होते.