हैदराबाद : तेलंगणमध्ये रविवारी काँग्रेस सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राजभवनामध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काँग्रेसचे आमदार जी विवेक वेंकट स्वामी, ए लक्ष्मण कुमार आणि वाकिटी श्रीहरी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि अन्य नेते उपस्थित होते. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी महेश कुमार गौड आणि दिल्लीतील काँग्रेस समितीच्या नेत्यांदरम्यान मंत्रिपद आणि पक्षातील पदे याविषयी चर्चा झाल्यानंतर हा विस्तार करण्यात आला. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे एकूण संख्याबळ १८ असून आता मंत्रिमंडळाचे १५ सदस्य आहेत.