बिहारमधील राजकीय घडामोडी दिवसेंदिवस रंजक वळण घेत असतानाच सोमवारी भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. भाजप आणि नितीश कुमारांची ही युती प्रत्यक्षात आल्यास आगामी काळात बिहार व देशातील राजकीय समीकरणांवर प्रभाव पडू शकतो. नितीश कुमार यांचा जदयू पक्ष सध्या लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्तेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सीबीआयने घोटाळ्याच्या विविध प्रकरणांमध्ये लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांभोवतीचे चौकशीचे फास आवळले आहेत. त्यावरून नितीश कुमार राजदशी फारकत घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, राजदची साथ सोडल्यास नितीश कुमार यांचे सरकार कोसळू शकते. त्यामुळे नितीश हा निर्णय घेण्यास कचरत असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बिहार भाजपकडून नितीश कुमारांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. नितीश महाआघाडीतून बाहेर पडल्यास राज्याच्या कल्याणासाठी भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे, असे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी म्हटले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्त्वच घेईल, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नितीश यांच्यात धैर्य नाही, तेजस्वी यादवांकडून राजीनामा मागितल्यास सरकार पडण्याची भिती”

मात्र, गेल्या काही दिवसांत नितीश कुमार यांची भाजपशी वाढलेली जवळीक पाहता भाजपकडून त्यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यताच अधिक आहे. दरम्यान, नितीश यांनी अजूनपर्यंत लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर सीबीआयकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. यावरून नितीश कुमार सोयीचे राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे राजीनामा मागण्याचे धैर्य त्यांच्यात नाही असा टोला हिंदुस्तान अवाम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी लगावला होता. जर राज्यातील युती सरकारला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करायचा असेल तर नितीश यांनी त्या सर्व जणांचे राजीनामे मागायला हवेत ज्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने ठपका ठेवला आहे. अन्यथा सरकारला राज्यातील जनतेची काळजी नाही असा संदेश लोकांमध्ये जाईल असे मांझी यांनी म्हटले होते.

लालू कन्या खासदार मीसा भारतींना ईडीने बजावले समन्स

सीबीआयने शुक्रवारी रेल्वे उपहारगृहातील घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव, आयआरसीटीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पी.के. गोयल , लालूंचे निकटवर्तीय असलेल्या प्रेमचंद गुप्ता यांची पत्नी सुजाता यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर सीबीआयने राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can provide outside support to nitish kumar if he quits ruling alliance bihar bjp