केरळच्या कोची येथील कॅनरा बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात नुकतीच एक ‘निषेध पार्टी’ आयोजित करण्यात आली होती. कॅनरा बँकेच्या कोची येथील प्रादेशिक पदाधिकाऱ्याने कार्यालयाच्या कॅन्टिनमध्ये बीफ बनवण्यास व विकण्यास बंदी घातली. याविरोधात शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याविरोधात बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) या संघटनेशी संबंधित कर्मचाऱ्यांनी चक्क कार्यालयातच बीफ पार्टी केली. भारतात आमच्या आवडीचा आहार निवडण्याचा आम्हाला अधिकार आहे, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांकडून मांडण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं कोचीमध्ये?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कोचीमध्ये काही महिन्यांपूर्वीच बिहारमधून अश्विनी कुमार हे प्रादेशिक अधिकारी म्हणून बदली होऊन रुजू झाले आहेत. कार्यालयाच्या कॅन्टिनमध्ये बीफदेखील खाण्यासाठी उपलब्ध असल्याचं पाहून अश्विनी कुमार यांनी त्यावर आक्षेप घेतला. तसेच, कॅन्टिनमध्ये बीफ दिलं जाऊ नये, असे तोंडी आदेशच कुमार यांनी जारी केले. पण यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेगळाच मार्ग अवलंबला.

गुरुवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अश्विनी कुमार यांचे आदेश धुडकावून लावत थेट कार्यालयातच बीफ पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीमध्ये बीफसोबतच मालाबार पराठेदेखील दिले जात होते. यासंदर्भात BEFI च्या एर्नाकुलम येथील पदाधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कर्मचाऱ्यांची भूमिका मांडली आहे.

“केरळमध्ये असे आदेश कसे दिले जाऊ शकतात?”

प्रत्येकाला आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्याने मांडली. “काही दिवसांपूर्वी प्रादेशक व्यवस्थाप अश्विनी कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना कार्यालयात बीफ न खाण्याचे निर्देश दिले. कार्यालयाच्या कॅन्टिनमध्ये कधीतरी बीफदेखील खाण्यासाठी दिले जात होते. पण कर्मचाऱ्यांना कॅन्टिनमध्ये बीफ दिलं जाऊ नये अशी कुमार यांची इच्छा होती. या देशात आमचा आहार निवडण्याचा आम्हाला अधिकार आहे. ती प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. बीफ खाण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. केरळमध्ये एखादा अधिकारी असे आदेश कसे देऊ शकतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

माकपची RSS चं नाव घेत टीका

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेत या प्रकारावर टीका केली आहे. माकपचे आमदार के. टी. जलील यांनी फेसबुक पोस्टवर याबाबत भूमिका मांडली आहे. “केरळमध्ये संघ परिवाराचं धोरण चालणार नाही. इतरांनी काय खावं किंवा कोणते कपडे घालावेत यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. इथे लोक निर्भिडपणे फॅसिस्ट लोकांविरोधात बोलतात. कुणीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही. कारण ज्यांच्या पाठिशी कम्युनिस्ट आहेत, असे कॉमरेड्स कुणालाही भगवे झेंडे फडकावू देणार नाही आणि लोकांची शांतता भंगही करू देणार नाही”, असं या पोस्टमध्ये जलील यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात बँक व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. केरळमध्ये बीफचा लोकांच्या आहारात सामान्यपणे समावेश असतो. शिवाय, बीफवर बंदी घालण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरोधात इथे वारंवार आंदोलने झाल्याचंही दिसून आलं आहे. या आंदोलनांमध्येदेखील अशाच प्रकारे ‘बीफ फेस्टिव्हल’चेही आयोजिन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.