केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या बाहेर पेपर लीक झाला नाही, त्यामुळे देशाबाहेरील विद्यार्थ्यांची फेर परीक्षा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Our immediate concern of the children who have suffered and this decision is in that context. We will nail the person who did this: Secretary Education pic.twitter.com/FvtBgF7zaQ
— ANI (@ANI) March 30, 2018
Re-examination of Class 12th exam will be on 25th April: Secretary Education #CBSEPaperLeak pic.twitter.com/V4P5IXKjpJ
— ANI (@ANI) March 30, 2018
सीबीएसईचे पेपर फुटल्याचे वृत्त आल्यानंतर देशभरातून विद्यार्थी आणि पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी जंतरमंतर येथे शेकडो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली होती. तर शुक्रवारीही देशाच्या विविध भागात हीच परिस्थिती दिसून आली होती. पेपर फुटीचे तीव्र पडसाद देशभरातून पाहायला मिळाले होते. विरोधी पक्षांनही याप्रश्नी सरकारला घेरले होते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही याप्रकरणात उडी घेतली हाती. सीबीएसई बोर्डाच्या फुटलेल्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी टीका करत स्वत:ची चूक सुधारायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावतात असा सूर आळवला होता. देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी आपण असून त्यांनी फेरपरीक्षा देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले होते.
दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार, सीबीएसईने पेपर फुटीप्रकरणी आरोपी विकीला अटक केली आहे. विकी हा दिल्लीत खासगी शिकवणी घेतो. आरोपींना पकडण्यासाठी एसआयटीने विविध ठिकाणी छापे मारले आहेत. याप्रकरणी सीबीएसईच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.