पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यात दहावीचा निकाल ९४.४० टक्के, तर बारावीचा ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९७.४१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.४८ टक्के लागला. राज्याचा दहावीचा निकाल ९७.४२ टक्के आणि बारावीचा निकाल ९०.२९ टक्के लागला. देशपातळीवरील दहावीच्या निकालात २ लाख ३६ हजार ९९३ विद्यार्थ्यांना, तर बारावीच्या १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली. दरवर्षीच्या तुलनेत निकाल यंदा लांबला. या पार्श्वभूमीवर सीबीएससीचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकालाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत आढावा घेतला असता दहावीचा निकाल ४.६४ टक्के, तर बारावीचा निकाल जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता लक्षात घेऊन गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना श्रेणी न देण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला. पुणे विभागामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसह दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.
सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत स्वतंत्रपणे घेतल्या असल्या, तरी अंतिम निकालात लेखी परीक्षेला पहिल्या सत्रात ३० टक्के आणि द्वितीय सत्राला ७० टक्के गुणभार देण्यात आला. तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही सत्रांना समान महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सत्र परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करून घेतल्यास पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढले असल्यास वाढीव गुण आणि गुण कमी झाले असल्यास पूर्वीचे गुण विचारात घेण्यात आले. त्यानुसार दोन्ही सत्रांचा निकालातील गुण विचारात घेऊन अंतिम निकाल तयार करण्यात आल्याचे सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
दहावीचा निकाल
यंदा दहावीचे देशभरातून २२ हजार ७३१ शाळांतून नोंदणी केलेल्या २१ लाख ९ हजार २०८ विद्यार्थ्यांपैकी २० लाख ९३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ लाख ६६ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.४१ टक्क्यांनी जास्त आहे. विभागीय निकालात त्रिवेंद्रम विभागाने ९९.६८ टक्क्यांसह देशात अग्रस्थान पटकावले. तर ९९.२२ टक्क्यांसह बेंगळुरू द्वितीय आणि ९८.९७ टक्क्यांसह चेन्नई विभाग तिसऱ्या स्थानी राहिला. ९७.४१ टक्क्यांसह पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. राज्यातून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ९१ हजार २०४ विद्यार्थ्यांपैकी ९० हजार ८६८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ८८ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
बारावीचा निकाल
बारावीच्या परीक्षेसाठी १५ हजार ७९ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परीक्षा दिलेल्या १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३.२९ टक्क्यांनी जास्त आहे. विभागीय निकालात त्रिवेंद्रम विभाग ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडीवर आहे. त्या खालोखाल बेंगळुरू विभागाचा निकाल ९८.१६ टक्के आणि चेन्नई विभागाचा निकाल ९७.७९ टक्के लागला. नोएडा विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.२७ टक्के लागला. राज्यातून नोंदणी केलेल्या २८ हजार ९७१ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील २६ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा निकाल ९०.२९ टक्के लागला.
पुढील परीक्षेच्या तारखा
निकालाबरोबरच सीबीएसईकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार श्रेणीसुधार परीक्षा २३ ऑगस्टपासून, तर बारावीची नियमित परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.