चेन्नईमध्ये पोलिसांचा गणवेश विकणाऱ्या एका कापडाच्या दुकानातून ४५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कोडंबक्कम भागात हे दुकान असून हे पैसे एका सराफाचे असल्याचे दुकानदाराने म्हटले आहे.

चेन्नईमधील कोडंबक्कम परिसरात एम व्ही रामलिंगम अँड कंपनी हे कापडाचे दुकान आहे. या दुकानात पोलिसांचा युनिफॉर्म तयार होतो. या दुकानात जुन्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार चेन्नई पोलिसांनी दुकानावर छापा टाकून तब्बल ४५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. दुकानदाराने हे पैसे शहरातील एका सराफाचे असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या सराफाचे नाव जाहीर केले नसून त्याची चौकशी केली जाणार आहे. या जुन्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी दुकानात आणल्या होत्या असे दुकानदाराचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असल्याचे सांगत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, नोटाबंदीनंतर अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आयकर विभाग, ईडी, सीबीआय आणि पोलिसांची कारवाई सुरुच आहे. नोटाबंदीनंतर देशभरातून ९१ लाख करदाते कराच्या जाळ्यात ओढले गेले असून वैयक्तिक करदात्यांमध्ये प्राप्तिक विवरणपत्र भरणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.