US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी यावेळी चीनला लक्ष्य करत नव्याने टॅरिफ लादण्याची घोषणा केली. १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ आकारले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच अमेरिकन बनावटीच्या सॉफ्टवेअरच्या निर्यातीवर कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे. या घोषणनेतर चीनने ट्रम्प यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. चीनने अमेरिकेवर मनमानी दुटप्पी निकष लावल्याचा आरोप केला.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात, अमेरिकेचा हा निर्णय चीनच्या हितांवर गंभीर हानी पोहोचवणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेचे वातावरण बिघडेल, असेही चीनने म्हटले आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेचा हा निर्णय दुटप्पी धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, चीनला “संघर्ष करण्याची इच्छा नाही, पण लढायला घाबरत नाही,” असेही स्पष्ट केले आहे. तसेच गरज पडल्यास या विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.

गुरुवारी चीनने रेअर अर्थ मेटल्सच्या निर्यातीवर कठोर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जागभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादनांसाठी आवश्यक असलेल्या खनिजांचा देखील समावेश आहे. त्यानंतर अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादण्याचा हा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प काय म्हणाले होते?

ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “१ नोव्हेंबर २०२५ पासून (किंवा त्याआधी, चीन काय निर्णय घेतो हे पाहून) अमेरिका चीनच्या सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादत आहे. सध्या लागू असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त हे नवे शुल्क असेल. तसेच १ नोव्हेंबर पासून आम्ही अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही नियंत्रण आणू.”

“चीनने व्यापाराबाबत कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी जगातील देशांना एक पत्र पाठविल्याचे कळले. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, १ नोव्हेंबर २०२५ पासून ते त्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या देशात तयार होणाऱ्या इतर देशांच्या उत्पादनांवर निर्यात नियंत्रणे लादणार आहेत. याचा परिणाम निश्चितच अनेक देशांवर होईल. याची तयारी त्यांनी काही वर्षांपूर्वीच केल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही धक्कादायक गोष्ट असून इतर राष्ट्रांचा हा नैतिक अपमान आहे”, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ट्रम्प दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते, मात्र त्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी ही बैठक रद्द करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प आणखी एक पोस्ट लिहून म्हणाले, “दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या APEC शिखर परिषदेत मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होतो. पण आता असे करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”