कान महोत्सवाबरोबरच जगभरातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपला. या महोत्सवातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे गोल्डन बेअर हे सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीचे अव्वल पारितोषिक यंदा ‘ब्लॅक कोल थिन आईस’ या चीनी चित्रपटाने पटकाविले. एवढेच नव्हे तर दियाओ यिनान दिग्दर्शित या चित्रपटातील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक लियाओ फॅन या अभिनेत्याने पटकावून बाजी मारली. सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक ‘दी लिट्ल हाऊस’ या जपानी चित्रपटातील भूमिकेसाठी हारू कुरोकी या जपानी अभिनेत्रीला देण्यात आले.
वेस अ‍ॅण्डरसन दिग्दर्शित ‘ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल’ या ब्रिटिश-जर्मन विनोदी-नाटय़पूर्ण चित्रपटाला  सिल्वर बेअर परीक्षक पारितोषिक देण्यात आले. या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. तर ‘डिफ्रेट’ या इथिओपियाच्या चित्रपटाने प्रेक्षक पसंतीचे पारितोषिक पटकाविले.
अकरा दिवसांच्या या महोत्सवात जवळपास ४०० चित्रपट दाखविण्यात आले. यातील २३ चित्रपट स्पर्धात्मक गटात होते.
यंदाच्या ६४ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इम्तियाज अली दिग्दर्शित ‘हायवे’ या रोड मुव्ही प्रकारातल्या चित्रपटाचाही प्रीमियर खेळ दाखविण्यात आला. आलिया भट, रणदीप हुडा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट पुढील आठवडय़ात भारतात प्रदर्शित होत आहे.