India China Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर अमेरिका-भारत संबंध ताणले गेले आहेत. मात्र, असं असतानाच दुसरीकडे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्याआधी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी नवी दिल्लीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. यावेळी मंत्री एस जयशंकर आणि मंत्री वांग यी यांच्यात एक बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी मंत्री एस जयशंकर यांनी अपेक्षा व्यक्त केली की, “दोन्ही देशांमधील मतभेद वादात बदलू नयेत.” या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, “दहशतवादाविरुद्धची लढाई ही एक प्रमुख प्राथमिकता आहे. मी विचारांच्या देवाणघेवाणीची अपेक्षा करतो. एकंदरीत आमची अपेक्षा अशी आहे की भारत आणि चीनमधील स्थिर सहकार्य आणि दूरदृष्टी असलेले संबंध निर्माण करण्यास हातभार लावतील. जे आमच्या हितसंबंधांना पूरक असतील”, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

मंत्री एस जयशंकर यांनी पुढे सांगितलं की, “मंगळवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात सीमा समस्यांवर चर्चा होईल. हे खूप महत्वाचं आहे, कारण आमच्या संबंधांमधील कोणत्याही सकारात्मक गोष्टीचा आधार सीमावर्ती भागात संयुक्तपणे शांतता आणि शांतता राखण्याची क्षमता आहे. तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे जाणं देखील आवश्यक आहे. जगातील दोन सर्वात मोठे राष्ट्रे भेटतात तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा होणे स्वाभाविक आहे.”

“सध्याच्या परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता राखणे आणि ती वाढवणे हे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणांमध्ये दहशतवादाविरुद्धची लढाई ही आणखी एक प्रमुख प्राथमिकता आहे. मी आमच्या विचारांच्या देवाणघेवाणीची अपेक्षा करतो. चीनने सहकार्य वाढवण्यासाठी आणि संबंधांच्या सुधारणा विकासाची गती अधिक मजबूत करण्यासाठी विश्वास सामायिक केला”, असंही ते म्हणाले.