पीटीआय, नवी दिल्ली
चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी सोमवारी भारताच्या दौऱ्यावर येत आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या सीमावादावर ‘विशेष प्रतिनिधी’ स्तरावरील चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह ते सहभागी होतील. रशियातील कझान शहरात मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर ‘विशेष प्रतिनिधी स्तरा’वर संवादाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये डोभाल यांनी चीनमध्ये जाऊन यी यांच्याशी चर्चा केली होती. सोमवारी चीनचे परराष्ट्रमंत्री प्रामुख्याने डोभाल यांच्याशी चर्चेसाठी ते दिल्लीत येणार असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याबाबतही यावेळी संवाद होण्याची शक्यता आहे. या महिनाअखेर चीनमधील तिआनजिन शहरात होणाऱ्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) वार्षिक परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांची जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
मोदी यांच्या जपान आणि चीन दौऱ्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर वाढीव आयातशुल्क लादण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी-जिनपिंग भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढील आठवडय़ात जयशंकर मॉस्कोत
एकीकडे चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात येत असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही त्याच आठवडय़ात रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जयशंकर हे बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉस्कोला जाणार असून यावेळी ते त्यांचे रशियन समपदस्थ सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या वर्षांअखेर होणाऱ्या संभाव्य भारतभेटीबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेला जाण्याची शक्यता
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाषण करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ते अमेरिकेला जातील, अशी शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने भारताला लक्ष्य केले आहे. भारतावर ५० टक्के कर लावला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा अमेरिका दौरा निश्चित झाला, तर तो महत्त्वाचा ठरणार आहे.