चीनमध्ये घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा होत असल्याचं दिसून येतं. मग ती चीनच्या लोकसंख्येची असो, चीनच्या आधुनिक तंत्रज्ञानाची असो किंवा चीनी उत्पादनांची असो. या सर्व चर्चांमुळे चीनमधील वेगवेगळ्या गोष्टींबाबत अनेक तर्क-वितर्क किंवा अफवाही सुरू असतात. मात्र, जागतिक पटलावर चीनच्या असणाऱ्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील महत्त्वाच्या घडामोडींची सर्वत्र चर्चा होत असते. चीनमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराची सध्या सोशल मीडियापासून सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडतंय चीनमध्ये?
चीनमध्ये सध्या सरकारकडून कोणत्याही सामान्य बाबीसाठीही अव्वाच्या सव्वा दंड आकारला जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अनेकांनी यासंदर्भातल्या सविस्तर पोस्ट टाकून चीनी सरकार आणि प्रशासनाला प्रश्न केले आहेत. यातलाच एक प्रकार म्हणजे एका हॉटेलला चीनी व्यवस्थापनानं ग्राहकाला फक्त काकडी कापून दिली म्हणून तब्बल ५ हजार युआन म्हणजेच जवळपास ५८ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकाराची चर्चा सर्वत्र रंगू लागली असून यासारख्याच इतरही काही अशाच प्रकारांची चर्चा सध्या सुरू आहे.
काकडी कापून सर्व्ह केली म्हणून हॉटेलला तब्बल ५८ हजारांचा दंड! चीनमध्ये चाललंय काय?
चीनच्या शांघाय प्रांतात असणाऱ्या एका हॉटेल मालकाला चीनी व्यवस्थापनानं तब्बल ५८ हजारांचा दंड ठोठावला आहे. परवाना नसताना ग्राहकाला काकडी कापून दिली, म्हणून हा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सामान्य गोष्टींसाठीही व्यवस्थापनाकडून अव्वाच्या सव्वा दंड आकारला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर या प्रकारांना वाचा फोडली जात आहे.
चीनमधील ट्विटरसारखाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या वेईबोवर यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. या काकडी प्रकरणाच्या पोस्टला वेईबोवर तब्बल ९५ लाखाहून अधिक व्यूज मिळाल्याचा दावा सीएनबीसी टीव्ही १८ नं दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी चीनी प्रशासनाकडून अशा प्रकारे छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही अवाच्या सव्वा दंड आकारण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रक चालकांना ३८ हजार रुपयांचा दंड
चीनच्या हेनान प्रांतात काही ट्रकचालकांनी सरकारच्या वाहन वजन यंत्रणेवर आक्षेप घेत त्याच्या अचूकतेविषयी प्रश्न उपस्थित केला. मात्र, या ट्रकचालकांना गेल्या दोन वर्षांत जवळपास ३८ हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड आकारण्यात आल्याचं सीएनबीसीनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.