पीटीआय, डेहराडून : भाजप नेत्याच्या मुलावर हत्येचा संशय असलेल्या अंकिता भंडारीच्या शवविच्छेदन अहवालाबाबत नाराजी व्यक्त करत उत्तराखंडमध्ये नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. अंकिताच्या खुन्यांना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी हृषीकेश-बद्रिनाथ रस्ता रोखून धरला.

हृषीकेश येथील एम्समध्ये अंकिताचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृत्यू होण्यापूर्वी जखमी झाल्याचाही उल्लेख अहवालात आहे. याबाबत कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त करून अंत्यसंस्कारास सुरूवातीला नकार दिला. त्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अंकिताचे वडील वीरेंद्रसिंह भंडारी यांना तिथे नेले. हत्येचा तपास योग्य प्रकारे सुरू असून, पोलीस सर्व प्रकारचे सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखरचंद्र सुयाल यांनीही कारवाई योग्य प्रकारे सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरूच राहिले. अंकिताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका काही आंदोलकांनी घेतली. आरोपींना आपल्या हवाली करावे, आपण धडा शिकवू अशी मागणीही आंदोलक महिलांनी केली. अंकिताच्या हत्येचा निषेध म्हणून श्रीनगरमध्ये बंदही पाळण्यात आला. अखेर संध्याकाळी अलकनंदा नदीच्या काठावर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काय घडले?

भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित याचे पौरी जिल्ह्यात वनांतरा रिसॉर्ट आहे. तिथे काम करणारी अंकिता आठवडाभरापासून गायब होती. या प्रकरणी पुलकितसह तिघांना संशयावरून अटक केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. शनिवारी हृषीकेशजवळच्या चीला कालव्यात अंकिताचा मृतदेह आढळून आला.

अंत्यसंस्कारास विलंब का?

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल सविस्तर नाही. जोपर्यंत विस्तृत अहवाल हाती येत नाही, तोपर्यंत आम्ही अंकितावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका तिच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे गावातील शवागरात तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. संध्याकाळी प्रशासनाने समजूत घातल्यानंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारांस तयार झाले.