CJI BR Gavai Camel Ride: भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानासाठी दिलेल्या योगदानाबाबत बिकानेरच्या महाराजा गंगा सिंह विश्वविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि केंद्रीय कायदे मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश गवई यांनी केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्यासह उंटावरून वाळवंटाची सफारी करण्याचा आनंद घेतला.
बिकानेरच्या संस्कृतीचा घेतला आनंद
बिकानेरच्या दौऱ्यात सरन्यायाधीश गवई यांनी उंटगाडीवरून वाळवंटात फिरण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विजय बिश्नोईही उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी बिकानेरची संस्कृती, परंपरा आणि आदरातिथ्याचा अनुभव घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची चर्चा
सरन्यायाधीश गवई यांनी विश्वविद्यालयातील कार्यक्रमात बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची चर्चा केली. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला, हे विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले. तर अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, आंबेडकरांच्या पुढाकारातून महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांना यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी
या कार्यक्रमात बिकानेरच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी केली. खंडपीठाची जुनी मागणी वकिलांनी लावून धरली. यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले की, खंडपीठाची मागणी योग्य आहे, पण याचा मुख्य अधिकार राज्याच्या मुख्य न्यायाधीशांचा आहे.
उंटाच्या दूधापासून तयार केलेले पेढेही चाखले
बिकानेरच्या दौऱ्यात सरन्यायाधीशांनी विधिज्ञ सेवा शिबिरातही हजेरी लावली. येथील विविध स्टॉल्सना त्यांनी हजेरी लावली. एका स्टॉलवर त्यांनी उंटाच्या दुधापासून तयार केलेल्या पेढ्यांची चव चाखली. तसेच या दुधापासून तयार केलेल्या इतर उत्पादनांचीही माहिती घेतली.