Charlie Kirk old Remarks on Indians: उजव्या विचारसरणीचा कट्टर प्रसारक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जवळचा सहकारी चार्ली कर्कची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. युटा व्हॅली विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ३१ वर्षीय कर्क यांची हत्या करण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आणि कर्क यांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवू, असेही ते म्हणाले. आता कर्क यांनी केलेल्या जुन्या विधानांची चर्चा होत आहे. कर्क यांनी भारतीय स्थलांतरीतांविरोधात उघड विधान केले होते.

“अमेरिकेत आता जागा नाही. त्यामुळे अमेरिकेतील लोकांना प्रथम प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अमेरिकेने आता भारतीयांना व्हिसा देऊ नये”, असे विधान चार्ली कर्क यांनी केले होते. अमेरिकेने अवैध स्थलांतरितांविरोधात भूमिका घेतल्यानंतर कर्क यांनी हे विधान केले होते.

“भारतीय नागरिकांना कायदेशीर व्हिसा पुरविल्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या रोजगाराची जागा भारतीय घेत आहेत. जेवढे भारतीय इकडे आले आहेत, तेवढे पुरेसे आहेत. आता आपला देशा पूर्ण भरला आहे. त्यामुळे आता आपल्या लोकांना पहिली संधी द्या. बस्स झाले”, असेही विधान अलीकडेच २ सप्टेंबर रोजी एक्सवर कर्क यांनी केले होते.

फॉक्स न्यूज वृत्तवाहिनीच्या अँकर लॉरा इंग्राहम यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला उत्तर देत असताना चार्ली कर्क यांनी वरील विधान केले होते. लॉरा इंग्राहम म्हणाल्या की, भारताबरोबर व्यापार करणे म्हणजे तिथल्या लोकांना आणखी व्हिसा पुरविणे. मी व्यापारी तूट सहन करून त्यांना व्हिसा न पुरविण्याला पसंती देईल.

चार्ली कर्क यांनी इतरही बऱ्याच विषयात वादग्रस्त विधान केले होते. बंदूक बाळगण्याच्या कायद्याचे समर्थन त्यांनी केले होते. दुर्दैवाने याच प्रश्नावर बोलत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. नागरी हक्क, गर्भपात, समलैंगिकता यावरही त्यांनी टोकाची मते व्यक्त केली होती. तसेच करोना काळात करोना विषाणूला त्यांनी ‘चायना व्हायरस’ असे म्हटले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. (छायाचित्र-रॉयटर्स)

चार्ली कर्क कोण होते?

कर्क १८ वर्षांचे असताना त्यांनी टर्निंग पॉईंट नावाच्या संस्थेची शिकागो येथे स्थापना केली होती. महाविद्यालयात असतानाच कमी कर, मर्यादित सरकार यासंबंधीचे विचार ते विद्यार्थ्यांमध्ये पसरवत असत. ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर चार्ली कर्क यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते अनेक वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी झळकताना दिसले.