CM Yogi Adityanath defends ban on Halal products : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. श्रद्धेवर मोठे आघात केले असले तरी ‘राजकीय इस्लामकडे’ इतिहासात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे, असे वक्तव्य योगी आदित्यानाथ यांनी केले आहे. आरएसएसच्या गोरखपूर विभागातर्फे आयोजित ‘विचार-परिवार कुटुंब स्नेह मिलन’ व ‘दीपोत्सनव से राष्ट्रोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतवादाविरूद्ध लढा दिला, पण त्यांनी ‘राजकीय इस्लाम’ विरुद्धही युद्ध केले. यासाठी आपल्याला महाराणा सांगा, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंह आणि शिवाजी महाराज यांसारख्या महान योद्ध्यांचे आजही आठवण काढली जाते. त्यांनी दिलेल्या लढ्यासाठी आम्ही त्यांना देशाचे हीरो म्हणून सन्मान दिला.”

“आपल्या पूर्वजांनी राजकीय इस्लामविरोधात मोठा लढा दिला, तरीही इतिहासाच्या या बाजू मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिली आहे. हा ‘राजकीय इस्लाम’ तोच आहे ज्याचे उद्दीष्ट राष्ट्राचे विभाजन करून डेमोग्राफी बदलणे आहे,” असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

“लोकांना याबद्दल जागरूक करण्यासाठी, आरएसएस समाजाला एकत्र आणण्याची मोहीम चालवत आहे, जी कौतुकास्पद आहे,” असेही आदित्यनाथ पुढे बोलताना म्हणाले.

२५ हजार कोटींची कमाई

आदित्यनाथ यांनी पुढे बोलताना लोकांनी हलाल सर्टिफिकेट लेबल असलेल्या कोणतीही वस्तू खरेदी करण्यापासून दूर राहावे असे आवाहनही केले, कारण अशा वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा गैरवापर ‘दहशतवाद, लव्ह-जिहाद आणि धर्मांतर’ यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘हलाल’ सर्टिफिकशनच्या माध्यमातून २५००० कोटी रुपये कमावले जातात, असा दावाही त्यांनी केला.

तसेच यावेळी आदित्यनाथ यांनी बलरामपूर जिल्ह्यात छंगुर बाबा उर्फ जलालुद्दीन नावाच्या व्यक्तीकडून चालवल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा उल्लेख देखील केला. या रॅकेटचा पर्दाफाश करत करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा संदर्भ देत आदित्यनाथ म्हणाले की, “आमचे पथक गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या हलचालींवर लक्ष ठेवून होते आणि मला दर महिन्याला गोळा झालेल्या गुप्त माहितीबद्दल अपडेट दिली जात असे… मी पथकाला सूचित केले होते की, जेव्हा भक्कम पुरावे गोळा होतील, तेव्हाच त्याला पकडा, जेणेकरून प्रभावी कारवाई करता येईल.”

दरम्यान मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे म्हणाले की तो सहा महिन्यांपूर्वी निसटला, तेव्हा ते मिशन अपयशी होत असल्यामुळे पथकावर ओरडले. “जलालुद्दीन याला अखेर अटक झाली. तो समाजविरोधा कारवायांमध्ये सहभागी होता,” असेही आदित्यनाथ म्हणाले.

आदित्यनाथ यांनी असाही दावा केला की जलालुद्दीन याला हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशांतून निधी मिळत होता. “मी अशा प्रकारचे सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. जेव्हा तुम्ही खरेदीसाठी जाल, तेव्हा तुम्ही काळजीपूर्वकअशा वस्तू खरेदी करत नसल्याची खात्री करून घ्या. यामधून गोळा केलेला पैसा हा अशा प्रकारच्या षडयंत्रांमध्ये वापरला जाईल. आपल्या आसपासच्या भागात असे अनेक ‘छंगुर बाबा’ आजही सक्रिय आहेत,” असा आरोप त्यांनी केला