भाजप हा पक्ष म्हणजे स्वयंचलित बंदूक आहे, परंतु दुर्दैवाने त्यामध्ये गोळ्याच नाहीत, अशी टीका माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी. सी. परख यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून विरोधी पक्ष कोळसा खाण वाटपाबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करीत असतानाच तिवारी यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या काही वृत्तांकडे आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणाचा तपास सुरू असून तो सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याने ज्या पद्धतीने त्याबाबत मत व्यक्त केले जात आहे तो प्रकार अनुचित आहे, असेही तिवारी यांनी वार्ताहरांना सांगितले.
कोळसा घोटाळ्यात सीबीआयने परख यांनाही अटक केली आहे. पंतप्रधान यांचा निर्णय अंतिम असल्याने त्यांनाच कारस्थानाचे सूत्रधार धरले पाहिजे, असे मत परख यांनी यापूर्वी व्यक्त केले. त्यामुळे भाजपने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. ओदिशातील दोन कोळसा खाणींबाबत एफआयआर नोंदविण्यात आल्याने भाजपला नव्याने रसद मिळाली आहे का, असे विचारले असता, भाजपला रसद मिळण्याची गरज आहे का, असा सवाल तिवारी यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam manish tewari brands bjp a self firing automatic weapon full of blanks