Coldriff Cough Syrup Deaths: विषारी कफ सिरप प्यायल्याने २२ मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली होती. यानंतर मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील एका न्यायालयाने गुरूवारी त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या कंपनीच्या मालकाने न्यायालयात काय युक्तीवाद केला याबद्दल माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांच्या सात सदस्यांच्या पथकाने स्रेसन फार्मास्युटिकल (Sresan Pharmaceutical) मॅन्युफॅक्चरचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नईतील कोडंबक्कम येथील त्यांच्या घरातू अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथन यांनी न्यायालयात ते अनेक वर्षांपासून ‘कोणत्याही समस्येशिवाय’ कफ सिरपचे उत्पादन करत आहेत, असा युक्तीवाद केला

स्रेशन फार्मास्युटिकलने तयार केलेले कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्याने छिंदवाडाच्या परासिया शहरात अनेक मुले आजारी पडल्याचे आणि त्यांच्या किडनीला इजा झाल्याचे समोर आले होते. यापैकी किमान २२ मुलांचा मृत्यू झाला आहे. या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलची धोकादायक प्रमाण आढळून आले आहे आणि तेव्हापासून याच्यावर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

छिंदवाडाचे एसपी अजय पांडे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “आरोपीला १० दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. आम्ही जप्त केलेल्या पुराव्यांच्या यादीबाबत आरोपीची चौकशी करू इच्छितो.”

पोलिसांनी काय सांगितलं?

रंगनाथन यांना सिव्हील न्यायाधीश शैलेंद्र उईके यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी ते अनेक वर्षांपासून कफ सिरप तयार करत आहेत आणि उत्पादनाबद्दल कधीही कोणतीही समस्या आली नाही, असा युक्तिवाद त्यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. तसेच रंगनाथन यांनी आपला ब्लड प्रेशरची समस्या असल्याचा मुद्दा मांडत, त्यांना पोलीस कोठडीत न पाठवण्याची विनंती केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हे त्यांचे पुरवठादार, साठा करणारे आणि वैद्यकीय प्रतिनिधींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी केली जाईल, जेणेकरून कफ सिरपच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये गुंतलेली प्रत्येक लिंक शोधता येईल. तसेच हे उत्पादन कसे तयार केले गेले, यावेळी कोणती तपासणी यंत्रणा होती आणि कोणते नियम मोडले गेले, यावरही चौकशीत लक्ष्य केंद्रीत केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी युक्तीवाद केला की, कफ सिरपची निर्मिती प्रक्रिया, त्याचे डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क आणि त्यांच्या कंपनीतील गुणवत्ता नियंत्रण तपासणी उघड करण्यासाठी रंगनाथन यांच्या कोठडीची आवश्यकता आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन न्यायालयाने कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली.