Shashi Tharoor on Karur Stampede: तमिळ अभिनेता आणि मागच्या वर्षी राजकारणात आलेल्या थलपती विजयच्या तमिळनाडूमधील करूर येथील रॅलीत शनिवारी भीषण चेंगराचेंगरा झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देशभरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच यापुढे जाऊन त्यांनी बंगळुरूमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरीची आठवण करून दिली. या घटनेतही ११ जणांचा मृत्यू झाला होता. सततच्या घडणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
काहीतरी गडबड होत आहे
तिरुअनंतपुरममध्ये पत्रकारांशी बोलताना शशी थरूर म्हणाले, करूर येथे घडलेली घटना खूपच दुःखद आणि वेदनादायक आहे. भारतात गेल्या काही काळापासून वारंवार चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. आपल्याकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यात काहीतरी गडबड होत आहे. दरवर्षी, एखादी तरी अशी घटना घडते. बंगळुरूत काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत ११ तरूणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे अकाली जाणे मनाला चटका देणारे होते.
शशी थरूर पुढे म्हणाले, सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण राष्ट्रीय स्तरावर काही चांगले धोरण आखू शकतो का, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. पूर्वी अभिनेता असलेला आणि आता राजकीय पुढारी झालेल्या नेत्याला ऐकायला लोक जातात किंवा क्रिकेटपटूंना बघायला जातात. पण अशावेळी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असताना काही नियम, कायदे आणि मानके पाळायला हवीत.
“मी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की, मोठ्या प्रमाणात एकत्र येणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी अत्यंत कठोर अशी नियमावली तयार करण्यात यावी. जेणेकरून भयानक चेंगराचेंगरीत कुणीही आपले प्रियजन गमावणार नाही”, असेही शशी थरूर पुढे म्हणाले.
अभिनेता विजयच्या रॅलीत काय झाले?
करूर जिल्ह्यात शनिवारी (२७ सप्टेंबर) अभिनेता थलपती विजयच्या पक्षातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
‘वेलिचम वेलीयेरू’ (प्रकाश उजळू द्या) या नावाने थलपती विजयच्या पक्षाने प्रचार रॅली काढली होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीसाठी १०,००० लोकांना परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी ५०० पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत हजारो लोक घटनास्थळी जमा झाले. चेंगराचेंगरी झाली तेव्हा सुमारे ३०,००० लोक उपस्थित होते, असे शासकीय यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.