संघटनेच्या रचनेचा विचार केल्यास भाजप आणि आरएसएससमोर काँग्रेस कुठेही नाही. संघटनेच्या ढाच्याचा विचार केल्यास काँग्रेस आणि भाजपची तुलनाच होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘स्पष्टपण बोलायचे झाल्यास काँग्रेस पक्षाची रचना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेसमोर कुठेही दिसत नाही,’ अशी प्रांजळ कबुली चिदंबरम यांनी दिली. ‘फिअरलेस अपोझिशन’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी चिदंबरम यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
‘मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्यात संघटनेची रचना महत्त्वाची असते. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला २९ राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी २९ रणनितींचा अवलंब करावा लागेल. गुजरातमध्ये यशस्वी ठरलेली रणनिती आसाममध्ये यशस्वी ठरु शकणार नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २९ राज्यांसाठी २९ व्यूहनिती असायला हव्यात, असे पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे,’ असेही चिदंबरम यांनी सांगितले.
‘आम्ही राजकीय वादविवादात पराभूत झालो असलो, तरीही आम्ही आर्थिक वादविवादात विजय मिळवला आहे,’ अशा शब्दांमध्ये चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर भाष्य केले. ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न ७.८३ टक्क्यांवरुन ६.६१ घसरले आहे. सीएसओच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे,’ अशा शब्दांमध्ये चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे नुकसान झाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
यावेळी चिदंबरम यांनी काश्मीर प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असताना आलेल्या अनुभवांचाही उल्लेख केला. ‘काश्मीरमधील ३७० कलम कायम असायला हवे. तेथील नागरिकांचा विश्वास संपादन अत्यंत आवश्यक आहे,’ असे चिदंबरम यांनी म्हटले.