काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या मधमाशीच्या उपमेसंबंधी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेची दखल घेत मोदी यांच्यासारख्या ‘स्वयंघोषित देशभक्ता’स उपमेचा अर्थही कळत नाही काय, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. त्याग आणि ऐक्य हे मोदी यांच्यासारख्यांच्या समजेपलीकडे आहे, असा टोमणा माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी मारला.
काँग्रेसच्या नेत्याने देशाला मधमाशाच्या पोळ्याची उपमा दिल्याचे ऐकून आपल्याला कमालीचा धक्का बसला आणि दु:खही झाले, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली होती. काँग्रेसमधील माझे मित्र अशा प्रकारे विचार कसा करतात याचेच मला आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नेत्यांनी देशाला मधमाशीच्या पोळ्याची उपमा देण्यापेक्षा देश आपली भारतमाता आहे, अशा पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करावा. काँग्रेसजनांना भारत समजू शकत नसेल तर त्यांनी दुसऱ्यांकडून भारत समजून घ्यावा परंतु देशाचा अपमान करू नये, असेही मोदी म्हणाले होते.
मोदी यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना ऐक्य, त्याग अशा गोष्टी मोदी यांच्यासारख्या स्वयंघोषित देशभक्तांच्या डोक्यावरूनच जातात, अशी टीका तिवारी यांनी केली. धर्माचे राजकारण करताना भारताच्या धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यासाठी ज्यांना वेळ मिळत नाही, त्यांची समज वाढेल, अशी आशा तिवारी यांनी व्यक्त केली.
भाजपच्या कोणत्याही नेत्याने स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेला नसल्यामुळे मोदी यांच्यासारख्या कोणत्याही नेत्याकडून काँग्रेसला देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही, अशी टीका अन्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी केली आहे. मोदी हे भारतमातेसंबंधी बोलत असतात परंतु भारतमातेसाठी भाजपचा कोणताही नेता स्वातंत्र्यलढय़ात लढलेला नाही. ज्या नेत्याने देशासाठी आपला पिता आणि आजीला गमावले आहे, त्यालाच मोदी असे धडे देतात हे अजब आहे, असे शुक्ला म्हणाले.