जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरामध्ये आहेत. ज्यांना शक्य आहे, ते घरामधूनच वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना सुट्टीचे पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.

पण अमेरिकेतील न्यू यॉर्क सरकारने वेगळा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला दिला आहे. करोना व्हायरसच्या संकटाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. लोक या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेगवेगळे कल्पक मार्ग शोधून काढत आहेत. काही जण कुटुंबासोबत असल्याने आनंदी आहेत तर काही जण या सुट्टीमध्ये आपले छंद जोपासत आहेत.

या कठिण काळात लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. “चुंबनामुळे COVID-19 चा प्रसार होऊ शकतो. दुसरं कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. साबणाने सेक्स टॉइज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे COVID-19 चा फैलाव होणार नाही” असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने अधिकृत टि्वटर अकाउंटवर म्हटले आहे.

हस्तमैथुनामुळे मानसिक आणि शारीरिक फायदा होत असल्याचे आतापर्यंत वेगवेगळया लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे. हस्तमैथुनामुळे तणाव कमी होतो, चांगली झोप लागते, लक्ष केंद्रीत होण्याबरोबरच लैंगिक क्षमता वाढत असल्याचे काही लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे.