करोना व्हायरसमुळे भारतात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये करोनाची लागण झालेल्या ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. यासोबत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे करोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
करोना व्हायसरमुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढत चालला आहे. बिहारमध्ये करोनाचा पहिला बळी गेला असून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाला पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत तरुणाला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा तरुण बिहारमधील मुंगेर येथे राहणारा होता. नुकताच तो कतारमधून परतला होता.
पाटणामध्ये अजून एक रुग्ण सापडला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याआधी शनिवारी रात्री मुंबईत ६३ वर्षीय व्यक्तीचं निधन झालं. मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. भारतात करोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३४७ वर पोहोचला आहे.