करोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातलं असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. यामुळे अमेरिकन सरकारने लोकांना आपल्या घऱी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्यास सांगितलं आहे. दरम्यान करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने एक ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून लोकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सीमारेषाही अमेरिकेकडून बंद केल्या आहेत. सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला असून शाळा तसंच अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लाखो लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देत आहेत.

अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्पष्ट सांगितलं आहे की, “तुमची योजना विस्कळीत होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला अनिश्चित काळासाठी देशाबाहेर थांबावं लागू शकतं”. करोना व्हायरसचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही पडत असून स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला करोनाकडे गांभीर्याने न पाहिल्याचे परिणाम दिसायला लागले असून त्यांनी आता तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील १२,२६० लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. करोनाचे सर्वात जास्त रुग्ण वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये आहेत. लॉस एंजेलिसमध्ये सर्व शॉपिंग सेंटर्स आणि महत्त्वाचे नसणारे सर्व व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना १० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा आदेश दिला आहे.

जागतिक बळींची संख्या १०  हजाराच्या पार
करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०,००० पेक्षा जास्त झाली आहे. सर्वात जास्त म्हणजे ३,४०० पेक्षा जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. त्या खालोखाल ३,३१२ जणांचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. किमान २,४४,५०० जणांना या विषाणूची लागण झालेली आहे. भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण चार जणांनी प्राण गमावला आहे.