देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अमलबाजवणी केली जात आहे. याचच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्चपासून सुरू होणार आहे, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) COVID-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

अरोरा यांनी सांगितले की, ‘जानेवारीच्या अखेरीस १५-१७ वर्षे वयोगटातील ७.४ कोटी मुलांना करोना लसीचा पहिला डोस मिळेल. यानंतर, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आम्ही या मुलांना दुसरा डोस देण्यास सुरुवात करू आणि महिन्याच्या अखेरीस प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस मिळेल. त्यानंतर आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून १२-१४ वर्षांच्या मुलांना लस देणे सुरू करू शकतो.

तज्ञ म्हणतात की, १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले प्रौढांप्रमाणेच असतात. त्यामुळे सर्वप्रथम १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी सांगितले. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर या वयाखालील बालकांचे लसीकरण सुरू केले जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid vaccination for 12 to 14 year olds is likely to start by march msr