Covid vaccine causing cardiac deaths?: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरूणांमध्ये हृदयविकारामुळे वाढत चाललेल्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. करोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात ४० वर्षांखालील प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त होत असताना हे निष्कर्ष समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, करोनावरील लसीकरण आणि तरूणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण यात कोणताही संबंध नाही. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात जीवनशैली आणि आधीच्या आजारांना मृत्यूसाठी कारणीभूत ठरविण्यात आले आहे.

करोना महामारीनंतर अनेक ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरूणांचे मृत्यू होत असल्याचे समोर आले. नाचताना, क्रिकेट खेळताना तरूणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे व्हिडीओही व्हायरल झालेले आहेत. यामुळे अनेकदा भीती व्यक्त केली जात होती.

मृत्यूमध्ये वाढ होण्याची कारणे काय?

अचानक कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, जसे की, अनुवांशिक, बदललेली जीवनशैली, आधीपासूनच असलेले आजार आणि करोनानंतर आरोग्याशी संबंधित निर्माण झालेले प्रश्न. अचानक होणाऱ्या मृत्यूशी संबंध जोडणारी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत,” असेही निवेदनात म्हटले आहे.

शेफाली जरीवालाचा मृत्यू

गेल्या आठवड्यातच देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. काटा लगा गर्ल म्हणून लोकप्रिय असेलली बॉलिवूडची अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती फक्त ४२ वर्षांची होती.

रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. तसेच पोलिसांनीही या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याची शक्यता वर्तविली आहे.