गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ प्लॅस्टिकवर बंदी आणावी म्हणून जीवाचे रान करत आहेत परंतु त्यांना जे शक्य झाले नाही ते मध्य प्रदेशातील गोरक्षकांना शक्य झाले आहे. प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे गायी मृत्यूमुखी पडत आहेत त्यामुळे प्लॅस्टिकवर बंदी आणावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. मध्य प्रदेश सरकारने ती मान्य केली आहे.
गायी प्लॅस्टिक खातात. त्यांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे त्या आजारी पडतात. त्यामुळे प्लॅस्टिकवर बंदी आणावी असा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. प्लॅस्टिकमुळे गायी आजारी पडत आहेत त्यांना विविध आजार होऊन त्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे तेव्हा त्वरित प्लॅस्टिकवर बंदी आणावी अशी मागणी एका मंत्री महोदयांनी केली होती. तसेच, प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी देखील हानीकारक असल्याचे या मंत्र्यांनी म्हटले होते. काही गायींच्या पोटातून चार पाच किलो प्लॅस्टिक देखील काढण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
याबरोबरच मध्य प्रदेशमध्ये दारुबंदी करण्याचा सुद्धा विचार सुरू आहे. संपूर्ण राज्यात मद्यबंदी लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. सुरुवातीला नर्मदा नदीच्या पात्रापासून ५ किमी भागामध्ये दारुविक्रीची बंदी करण्यात येणार आहे. त्यानंतर निवासी भागांमधील दारूंच्या दुकानांवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यानंतर शाळा कॉलेजजवळ असलेल्या दारुच्या दुकानांवर बंदी येणार आहे. अशी टप्प्या टप्प्याने दारुबंदी घालण्यात येणार असल्याचा सरकारचा मानस आहे. या शिवाय नव्या परवाने देखील दिले जाणार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये दारुचा विरोध वाढत चालला आहे. गुजरात, बिहार या दोन राज्यामध्ये पूर्णतः दारुबंदी आहे तर केरळामध्ये पंचतारांकित हॉटेलांचा अपवाद वगळता सर्व ठिकाण दारुबंदी आहे.