Crime News : ३२ वर्षांच्या एका विवाहितेने स्वतःला पेटवून आयुष्य संपवलं. ही घटना तामिळनाडूच्या रामानाथपुरम जिल्ह्यातील आहे. तिच्या सासऱ्यांकडून तिचा लैंगिक छळ केला जायचा, तसंच हुंडा आण असंही सांगितलं जायचं म्हणून तिने कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे. रंजिता असं या मृत महिलेचं नाव आहे.

नेमकी काय घटना घडली?

३२ वर्षांच्या रंजिता नावाच्या विवाहितेने सासऱ्यांच्या लैंगिक छळाला आणि हुंड्यासाठीच्या तगाद्याला कंटाळून तिचं आयुष्य संपवलं. तमिळनाडूतल्या रामानाथपुरम जिल्ह्यातील ही घटना आहे. तिने स्वतःला पेटवून घेतलं. त्यानंतर तिला रुग्णालयात आणलं गेलं. मात्र रंजिता ही महिला ७० टक्के भाजली होती. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. रंजिताने या अवस्थेत पोलिसांकडे जो जबाब नोंदवला त्यात हे सांगितलं की “माझे सासरे मला मिठी मारतात. मी ही गोष्ट सहनच करु शकले नाही त्यामुळे मी स्वतःला पेटवून घेतलं.” अशी माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी ही देखील माहिती दिली की मृत रंजिताचा मुलगा सातवीत आहे. त्याने आईचा होणारा छळ पाहिला होता. आईचा लैंगिक छळ होत होता हे देखील त्या मुलाला माहीत आहे. दरम्यान रंजिताच्या कुटुंबाने हा आरोप केला आहे की रंजिताचे सासरे तिच्याशी गैरवर्तन करत, शिवाय हुंड्यासाठी तिच्यामागे तगादा लावत असत. या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रंजिताच्या बहिणीने काय सांगितलं?

रंजिताच्या बहिणीने पत्रकारांना सांगितलं की माझ्या बहिणीने १३ वर्षे तिच्या सासरच्या मंडळींकडून छळ सहन केला. त्यांना हुंडा म्हणून जमीन आणि आणखी सोनं हवं होतं. तिच्या सासऱ्यांनी तिचा लैंगिक छळ केला. तिने आम्हाला याबाबत कल्पना दिली होती. तिचा नवरा दारु प्यायचा, तिला मारहाण करायचा आणि शांत बस सांगायचा. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसंच मृत्यूपूर्वी विवाहितेने जे आरोप केले आणि तिच्या कुटुंबाने जे आरोप केले त्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

रंजिताचं लग्न १३ वर्षांपूर्वी झालं होतं. तिने हुंड्याची मागणी आणि लैंगिक छळाला कंटाळून आयुष्य संपवलं. दरम्यान हे प्रकरण हुंडा प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत येत नाही. मात्र आम्ही या प्रकरणाचे सगळे पैलू तपासून पाहतो आहोत. रंजिताच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी स्थानिक सामाजिक संस्थांनी रंजिताला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.