Uttarakhand Cow Meat Smuggling Case Update: गोमांस तस्करीचा संशय असणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ओलीस ठेवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उत्तराखंडमध्ये घडला आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात हा प्रकार घडला असून यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हरिद्वारच्या रूरकी परिसरातील माधोपूर गावात एका व्यक्तीवर गोमांस खाल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या मागावर पोलीस असतानाच त्या व्यक्तीनं एका तळ्यात उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
नेमकं घडलं काय?
रविवारी माधोपूरमध्ये वासिम नावाच्या एका व्यक्तीची गोमांस तस्करी केल्याच्या संशयातून चौकशी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी माधोपूरमध्ये वासिमला स्कूटरवर जात असताना हटकलं. त्यामुळे घाबरलेल्या वासिमनं तिथून पळ काढला. पोलीस त्याचा पाठलाग करत असतानाच वासिमनं एका तळ्यात उडी मारली. तळ्यात बुडून वासिमचा मृत्यू झाला, असं पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, स्थानिकांचं पोलिसांच्या दाव्यामुळे समाधान झालं नाही. स्थानिकांनी वासिमच्या मागावर असणाऱ्या आख्ख्या पोलीस तुकडीलाच घेराव घातला. त्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. वासिमचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला नसून पोलिसांनी त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला, असा आरोप स्थानिकांनी केला.
“…तो पळाला तेव्हा आमचा संशय बळावला”
पोलीस निरीक्षक शरद सिंह यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. “जेव्हा संबंधित व्यक्तीने आम्हाला पाहून पळ काढला, तेव्हा आम्हाला काहीतरी संशयास्पद घडल्याची शंका आली. आम्ही तिथे शोध घेतला असता एका निळ्या पिशवीत जवळपास ३५ किलो गुलाबी रंगाचं मांस सात वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरलेलं आढळून आलं. स्कूटरची ट्रंक उघडली असता तिथेही १५ किलो मांस आढळून आलं”, असं सिंह यांनी सांगितलं.
मात्र, त्यानंतर काही वेळातच मोठ्या संख्येनं लोक जमा झाले. त्यांनी पोलीस पथकाला गराडा घातला. हवालदाराशी गैरवर्तन केलं. त्यांना ओलीस ठेवलं, असा दावा सिंह यांनी केला आहे. पोलिसांनी नंतर तलावातून मृत व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणा पोलिसांनी आत्तापर्यंत कथित गोमांस तस्करी, जमावानं पोलिसांना धक्काबुक्की करणे आणि पोलिसांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करणे अशा आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd