जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याची जीभ छाटणाऱ्याला भाजप युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकाऱ्याकडून पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातील बदायू येथील भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष कुलदीप वार्ष्णेय याने म्हटले आहे की, कन्हैय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आमच्या संघटनेबद्दल अपशब्द काढले आहेत. भारताविरोधी घोषणा देण्यासाठी कन्हैय्यानेच इतर आंदोलकांना भाग पाडले, असा आरोप करत कुलदीपने कन्हैय्याची जो जीभ कापेल त्याला पाच लाखांचे बक्षीस घोषित केले आहे. यानिमित्ताने भाजपमधील वाचाळवीरांच्या यादीत आणखी एकाची भर पडली असे म्हणावे लागेल. या वक्तव्यवरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. पोलिसाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा कारवाई केली गेली नाही.