पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात रविवारी रात्री दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. या वादळामुळे सर्वत्र झाडे कोसळली असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच पश्चिम बंगालमधील वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वादळामुळे एकाचा मृत्यू झाल्याचेही पुढे आलं आहे.

हेही वाचा – ३७ जातींपैकी काहींना केंद्रीय सूचीतून वगळणार; पश्चिम बंगाल ओबीसी प्रमाणपत्र रद्द प्रकरण

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. रविवारी रात्री कोलकाता शहरात १४० मिमी. पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत

रविवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात वाहतूक सेवाही विस्कळीत असून काही रेल्ले गाड्या करण्यात आल्या आहेत. तसेच मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. खराब हवामानाचा फटका हवाई वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. या वादळामुळे कोलकाता विमानतळावरील काही उड्डाणे रविवारी दुपारपासूनच स्थगित करण्यात आली होती. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे आज सकाळी ९ वाजतापासून विमान सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू :

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोलकात्यात भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं पुढं आलं आहे. मोहम्मद साजिब असं या व्यक्तीचं नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एंटाली भागातील बिबीर बागान येथे ही घटना घडली.

हेही वाचा – ‘रेमल’ चक्रीवादळ आज किनार्‍यावर धडकणार; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळं कशी तयार होतात? सविस्तर जाणून घ्या…

हवामान विभागाकडून अलर्ट जारी

दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय हवामान विभागाकडून राज्यातील मुर्शिदाबाद आणि नादिया या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये सोमवारी ७ ते २० सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोलकात्यासह आठ जिल्ह्यांमध्ये ३० ते ६० किमी प्रतितास वेगाने गडगडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.