dabur vs patanjali : योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीच्या जाहिरातींच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायायालयाने पतंजली कंपनीला ते त्यांच्या स्वतःच्या च्यवनप्राशला चांगले सांगत असताना, इतर सर्व च्यवनप्राश ब्रँड्सना ‘धोका’ (फसवे किंवा फसवणूक करणारे) असे कसे म्हणू शकतात? असा प्रश्न विचारला आहे.
डाबर इंडियाने पतंजलीच्या अशा जाहिराती चालवण्यावर अंतरिम बंदी (interim injunction) घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती तेजस करिया म्हणाले की, पतंजली स्वत: सर्वोत्तम असल्याचा दावा करू शकते, परंतु ते इतरांना फसवे म्हणू शकत नाहीत.
“तुम्ही म्हणत आहात की सर्वजण हा ‘धोका’ आहेत, आणि फक्त मी खराखुरा आहे. तुम्ही इतर सर्व च्यवनप्राशला ‘धोका’ कसे म्हणू शकता? तुम्ही ते दुय्यम म्हणू शकता, पण तुम्ही त्यांना फ्रॉड म्हणू शकत नाही….शब्दकोशात दुसरा शब्द उपलब्ध नाही का जो ‘धोका’ या ऐवजी वापरला जाऊ शकेल?” असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला.
“धोका हा नकारात्मक, अपमानजनक शब्द आहे. तुम्ही म्हणत आहात ते (कंपन्या) या फ्रॉड आहेत आणि लोक काहीतरी बनावट खात आहेत,” असेही ते म्हणाले.
डाबरने असाही आरोप केला आहे की पंतजली ही कंपनी खोटे दावे करत आहे की त्यांच्या च्यवनप्राशमध्ये ५१ आयुर्वेदिक औषधी आणि केशर आहे. कारण २०१४ च्या सरकारच्या अॅडव्हायजरीमध्ये या दाव्याला दिशाभूल करणारे ठरवण्यात आले होते.
तसेच त्यांनी युक्तीवाद केला की, क्लासिकल आयुर्वेदिक औषधाला ‘विशेष’ (Special) असे प्रीफिक्स लावणे, हे ड्रग्ज रुल्समधील नियम १५७(१-बी) चे उल्लंघन आहे. या नियमानुसार आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनच्या फसव्या लेबलिंगवर बंधने घालण्यात आलेली आहेत.
डाबरच्या वतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील संदीप सेठी म्हणाले की, च्यवनप्राश हे क्लास ऑफ गुज आहे आणि इतर सर्व च्यवनप्राशना ‘धोका’ असे म्हणून, पतंजली त्या सर्वांची बदनामी करत आहे.
“कोणालाही ‘धोका’ असे संबोधने हे बदनामी करणारे आहे. ते म्हणू शकतात की आम्ही तुम्हाला ओळखत नाही, पण ते सर्वांना एकाच ब्रशने रंगवू शकत नाहीत…. एका स्वयंघोषित योग गुरूकडून हे येत असल्याने ही बाब अधिक गंभीर आहे कारण लोक एका योग गुरूंना काही प्रमाणात सत्यतेशी जोडतात,” असे सेठी म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, डाबर त्यांचे च्यवनप्राश नियमांचे पालन करत तयार करत आहे आणि जर एखादा प्रॉडक्ट तसे करत असेल, तर त्याला ‘धोका’ म्हटले जाऊ शकत नाही.
सेठी म्हणाले, “भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. माझ्याकडे एत १०० वर्षांहून जुनी कंपनी आहे. माझा बाजारात ६१ टक्के वाटा आहे. फक्त पाच दिवसांमध्ये ही जाहिरात ९ कोटी लोकांनी पाहिली आहे. लोक अशा प्रकारे संवेदनशील आहेत.”
पतंजलीच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव नायर म्हणाले की, पतंजलीची जाहिरात ही अतिशयोक्ती (hyperbole) आणि फुशारकी करणार असून, कायद्यानुसार त्याला परवानगी आहे. दरम्यान या प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
