Ludhiana Murder Case: उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे संबंध देशभरात खळबळ उडाली होती. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकरानं मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरला. त्यानंतर निळा ड्रम चर्चेचा विषय ठरत होता. त्यातच आता पंजाबच्या लुधियाना येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका निळ्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे पाय आणि मान बांधलेली आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतदेह कुजल्यानंतर आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली. यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख कुलवंत कौर यांनी म्हटले की, निळ्या ड्रममध्ये प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आला होता. मृत व्यक्ती स्थलांतरित मजूर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कुलवंत कौर पुढे म्हणाल्या की, मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला असून लुधियानातील ४२ ड्रम उत्पादकांची यादी तयार केली आहे. ज्या ड्रममध्ये मृतदेह आढळून आला, तो नवीनच असल्यामुळे सदर हत्या पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना पोलिसांनी सांगितले की, ड्रम नवीन दिसत आहे. हत्येपूर्वी तो विकत घेतला असावा.

ज्याठिकाणी मृतदेह आढळून आला तेथील पाच किलोमीटर परिघातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक, बस स्टँड येथील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. तसेच घटनास्थळावरून गेलेल्या संशयास्पद क्रमाकांच्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे.

तपास अधिकारी कुलवंत कौर यांनी म्हटले की, या परिसरातील ड्रम उत्पादक कंपन्यांची चौकशी केली जात आहे. तसेच या परिसरात अनेक स्थलांतरित मजूर काम करतात. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.