वृत्तसंस्था, भोपाळ
काही अज्ञात जागतिक शक्ती भारताच्या आर्थिक गतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सगळ्यांचे ‘बॉस’ आहोत, असे ते मानतात, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाव न घेता लक्ष्य केले. भारताचा वेगाने विकास होत असल्याचे त्यांच्या पचनी पडत नसल्याची टीकाही संरक्षणमंत्र्यांनी केली.
रशियाकडून इंधन घेत असल्याबद्दल अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. या पार्श्वभूमीवर सिंह यांनी तोफ डागली. मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात सिंह म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने महाग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत जलद विकास करणारा देश असल्याने काही जण मत्सर करतात. आपल्या विकासाच्या गतीने ते खूश नाहीत. त्यामुळेच भारतीय वस्तू महाग करण्याचे त्यांचे प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मात्र कोणतीही शक्ती भारताची ही वेगवान प्रगती रोखू शकत नाही, असा आत्मविश्वासही सिंह यांनी बोलून दाखविला.
‘संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण…’
संरक्षण क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण झालो असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. पूर्वी विमाने आणि शस्त्रे यांसह संरक्षण गरजांसाठी भारत परदेशी पुरवठादारांवर अवलंबून होता, परंतु आता बहुतेक उत्पादन देशांतर्गत केले जात आहे. राष्ट्रीय गरजा पूर्ण करून इतर देशांमध्येही निर्यात केली जात आहेत. आज जर कोणत्याही देशाची धडाकेबाज आणि गतिमान अर्थव्यवस्था असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. २०१४ मध्ये भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ११ व्या स्थानावर होता. आज, जगातील पहिल्या चार देशांमध्ये आपली गणना होते, असेही सिंह यांनी अधोरेखित केले.