Dehradun : देशात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ ही धोकादायक असल्याचं अनेकदा बोललंही जातं. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. हिंसा, जाळपोळ, गोळीबार, हाणामारी, खून, दरोडा, लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना विविध ठिकाणी घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

डेहराडूनमधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये एका ९ आणि १३ वर्षाच्या ऑटिस्टिक मुलांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. डेहराडून शहरातील पटेल नगर भागातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या दोन्ही मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप मुलांच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या घटनेत २९ वर्षीय व्यक्तीला व्यक्तीला अटक करण्यात आलं आहे.तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पतीच्या निधनानंतर या मुलांच्या आईने तिच्या मुलांचं नाव बोर्डिंग स्कूलमध्ये नोंदवलं होतं. कारण तिला तिची नोकरी सांभाळून या मुलांची काळजी घेणं कठीण होत होतं. त्यामुळे तिने त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं.

पण नुकतंच मुलांनी आपल्या आईला भेटण्याचा आग्रह धरला असता आई त्यांच्या मुलांच्या भेटीसाठी गेली असता हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या महिलेने सांगितलं की ती मे महिन्यांत मुलांच्या भेटीसाठी गेली असता तिला आधी त्या मुलांना भेटू दिले गेले नाही. त्यानंतर ती पुन्हा शाळेत गेली आणि मुलांना भेटण्याचा आग्रह धरला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुलांना भेटण्याची परवानगी दिली, असा आरोप तिने केला आहे.

दरम्यान, या मुलांनी आई भेटीला आल्यानंतर आईला झालेल्या घटनेची माहिती सांगितली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच शाळा प्रशासनाच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी सोनू नामक व्यक्तीला अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची राज्य बाल हक्क आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा ही कोणत्याही परवानग्याशिवाय म्हणजे बेकायदा सुरु करण्यात आली होती, असाही आरोप आता करण्यात येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग देखील जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे.