Viral Video Of Dehardun School Students Doing Manual Labour: विद्यार्थ्यांना शाळेत वाळू आणि खडी उचलायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देहराडूनमधील एका सरकारी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी रायपूर विभागातील बंजारावाला येथील सरकारी प्राथमिक शाळेतील आठ विद्यार्थी शाळेत डोक्यावर वाळू आणि खडी वाहून नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जिल्हा शिक्षण विभागाने या घटनेला दुजोरा दिला असून, मुलांना शारीरिक श्रम करायला लावल्याचे समोर आल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापिका अंजू मनदुली यांना निलंबित केले आहे. २००९ पासून याच शाळेत नोकरी करत असलेल्या मनदुली यांनी जुलैमध्ये मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला होता.

शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, शाळेतील इतर पाचही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही घटना सोमवारी शाळेच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान घडली होती.

शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या निलंबन पत्रात म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांना शारीरिक श्रम करायला लावले जात होते. यावरून शाळेच्या मुख्याध्यापिकेचा निष्काळजीपणा आणि शिस्तभंग दिसून येते. सोशल मीडिया आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहिती व व्हिडिओंच्या आधारे, विद्यार्थ्यांना वाळू आणि खडी उचलण्यासाठी कुदळ, फावडे आणि पाट्या देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा, २००९ आणि उत्तराखंड सरकारच्या महिला सक्षमीकरण विभाग व २०११ च्या बाल विकास अधिसूचनेच्या कलम १३ चे उल्लंघन आहे.”

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तपास अधिकाऱ्याला संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून घेणे, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करणे, सहाय्यक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देणे, विभागीय कारवाई पूर्ण करणे आणि ३० दिवसांच्या आत तपास अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तराखंडचे उच्च शिक्षण सचिव रविनाथ रमण यांनी सांगितले की, त्यांनी देहराडूनच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी व अहवाल मागवला आहे.

युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशननुसार, या शाळेत ३०९ विद्यार्थी आहेत. ही शाळा १९४९ मध्ये स्थापन झाली आहे. दरम्यान, मुख्याध्यापिका मनदुली यांनी दावा केला की त्यांना या घटनेची माहिती नव्हती आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून हे काम केले आहे.