Delhi blast outside Red Fort first responder Police Constable said never saw such bloodbath : दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात १० नोव्हेंबर रोजी भीषण स्फोट झाला. या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला. या स्फोटानंतर मदत करण्यासाठी पहिल्यांदा घटनास्थळी पोहचलेले हेड कॉन्स्टेबल थान सिंग यांनी त्या संध्याकाळची थरारक अनुभव सांगितला आहे. या स्फोटानंतर जखमींना ई-रिक्षातून रुग्णालयात घेऊन गेल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्या भयावह घटनेचे फोटो त्यांच्या फोनवर दाखवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. “माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही असा रक्तपात पाहिला नव्हता,” असे ते रडवेल्या आवाजात म्हणाले.
सिंग हे जवळपास १३ वर्षांपासून लाल किल्ला पोलिस चौकीत तैनात आहेत. ही चौकी एका पाच तात्पुरत्या स्वरुपातील खोल्यांचे एक कंपाऊंड आहे. त्यापैकी एक रिसेप्शन आणि एक बोर्डरूम आहे, ज्यामधून लाल किल्ल्याचा परिसर दिसतो.
सिंग यांनी चौकीतील बोर्डरूममधील दिव्याकडे आणि नुकतेच दुरूस्त केलेल्या सिलींगकडे बोट दाखवत सांगितले की, “स्फोटामुळे सिलिंगचे नुकसान झाले होते. इतरही खोल्यांचेही नुकसान झाले… स्फोट इतका जबरदस्त होता,” असे कॉन्स्टेबल सिंग यांनी सांगितले. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
पत्नीचा फोन आला…
१० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सिंग परिसरात ट्रॅफिकचे नियोजन करत असताना त्यांची पत्नी दीपीका यांनी त्यांना फोन केला. “ती उपवास करत होती. तिने मला विचारणा केली की मी जवळच असलेल्या गौरी शंकर मंदिरात जाऊन तिला देवाचे दर्शन घडवू शकतो का, जेणेकरून ती उपवास सोडू शकेल. मी जवळपास संध्याकाळी ६.५० वाजता मंदिरात पोहचल्यानंतर तिला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर एका मिनिटातच मला एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला,” असे त्यांनी सांगितले.
सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसा, ते संध्याकाळी ६.५४ वाजता स्फोट झाला त्या ठिकाणी पोहचले. वाहनांना आग लागली होती आणि इंधनाच्या टाक्यांचे स्फोट होत होते. “ढिगाऱ्यातून ज्या पहिल्या व्यक्तीला मी बाहेर काढले ती एक महिला होती, जी मदतीसाठी रडत होती. मी तिला ढिगाऱ्यातून बाहेर काढले, ई-रिक्षापर्यंत घेऊन गेलो, आणि ड्रायव्हरला तिला लोक नायक रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले,” असे सिंग यांनी पुढे सांगितले.
संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने येण्यास सुरूवात झाली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असेही त्यांनी सांगितले. सिंग यांच्याबरोबर कॉन्स्टेबल अजय आणि इतर स्थानिक पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी मिळून बचावकार्य केले.
“त्यानंतर आम्ही परिसर बंद करणे सुरू केले, नेताजी सुभाष मार्गाच्या अखेरच्या टोकापर्यंत रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले. त्यानंतर मी एका हात आणि पाय भाजलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यानंतर आणखी एक व्यक्ती, जो कारच्या बोनेट आणि विंडशील्डच्या मध्ये अडकला होता… त्याला लोक नायक रुग्णालयात नेण्यात आले,” सिंह पानावलेल्या डोळ्यांनी सांगितले.
स्पोटात जखमी झालेले लोक रुग्णालयात धाव घेऊ लागल्यानंतर संध्याकाळी सुमारे ७:०५ वाजता पहिले मेडीको लीगल सर्टिफिकेट तयार करण्यात आले, असेही सिंग यांनी सांगितले.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट नंबर १ आणि ४ हे सीलबंद करण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी संथ्याकाळी ७.१५ वाजता वाहनचालकांना दुसर्या रस्त्यांकडे वळवणे सुरू केले. सह पोलीस आयुक्त (मध्य) मधुर वर्मा यांनी ७:१० वाजेपर्यंत घटनास्थळी पोहचले आणि नेताजी रोड सीलबंद करत बाधित वाहने जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. “गुन्हे पथकाने काही मिनिटांमध्ये परिसर सुरक्षित केला आणि लाल किल्ला पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी तणावाच्या परिस्थितीत कमालीचे धाडस दाखवले,” असे डीसीपी (नॉर्थ) राजा बांठिया यांनी सांगितले.
संध्याकाळी ७.३० वाजता किमान ५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आणि संग यांनी सांगितले की ते जवळपास सुन्न झाले होते. “शरिराचे तुकडे सर्वत्र उडाले होते,” अशी आठवण देखील सिंग यांनी सांगितली.
जेव्हा सिंग यांनी त्यांचा फोन रात्री साडे अकराच्या सुमारास पाहिला, तेव्हा त्यांना १५० मिस्ड कॉल आलेले होते, ज्यामध्ये मित्र, सगकारी आणि पत्निने त्यांना फोन केले होते असे त्यांनी सांगितले.
“माझ्या पत्नीने स्फोटाचा आवाज ऐकला होता… त्यानंतर मला फोन कट करावा लागला. माझ्याशी संपर्क होत नसल्याने माझी मुले रडत होती. नंतर मी त्यांना परत फोन केला आणि तिला समजावून सांगितले. पण पुढील दोन दिवस मी घरी गेलो नाही,” असेही त्यांनी सांगितले.
