पाकिस्तानात बेपत्ता झालेले दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा येथील दोन मुस्लीम धर्मगुरु सोमवारी भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर या दोन्ही धर्मगुरुंचे आगमन झाले असून निजामुद्दीन दर्ग्यात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

सय्यद असीफ निझामी आणि त्यांचे पुतणे नझीम निझामी यांना १४ मार्च रोजी कराचीकडे जाणाऱ्या शाहीन एअरलाईन्सच्या विमानातून उतरवून ताब्यात घेण्यात आले होते. लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना पकडण्यात आले होते. या दोन्ही धर्मगुरुंना मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतले होते. ही संघटना अल्ताफ हुसैन यांची आहे. भारतातून गेलेल्या दोन्ही मौलवींचा या संघटनेशी काय संबंध आहे का याचा तपास घेण्यासाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट ही संघटना सिंध प्रांतातील दक्षिण भागात प्रबळ आहे. हैदराबाद, मिपुरखा, सक्कर येथे उर्दू भाषक लोक जास्त असून १९४७ मध्ये ते भारतातून पळून पाकिस्तानमध्ये गेले होते.असीफ निझामी आणि त्यांचा पुतण्या बहिणीला ८ मार्चला पाकिस्तानला गेले होते. १३ मार्चला लाहोरमध्ये आल्यावर त्यांनी सुफी संत बाबा फरीद गांग यांच्या समाधीस भेट दिली होती.

दोन्ही मौलवींच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना साकडे घालण्यात आले होते. स्वराज यांनी पाकचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर या दोघांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी सकाळी दोन्ही मौलवी भारतात परतले. दिल्ली विमानतळावरुन दोघेही निजामुद्दीन दर्गा येथे गेले. तिथे स्थानिकांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचे स्वागत केले.