भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकाची नियुक्ती (एसआयटी) करावी अशी मागणी करणारी याचिका सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केली होती. ६ जुलै रोजी ही याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, याप्रकरणी विशेष तपास पथक नेमावे आणि त्यावर कोर्टाने नजर ठेवावी, असेही या याचिकेत म्हटले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वामी यांनी दाखल केलेली याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. गुरूवारी झालेल्या सुनावणीत तुमच्याकडे इतकी सगळी माहिती कशी आली?, तुम्ही पोलीस तपासावर प्रश्न कसा काय उपस्थित करत आहात? तुमच्याकडे सुनंदा पुष्कर प्रकरणातले काही पुरावे होते तर ते आधी सादर का केले नाहीत? असे प्रश्न दिल्ली हायकोर्टाने सुब्रमण्यम स्वामींना विचारले. तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आरोप करू शकत नाही. सुनंदा पुष्कर प्रकरणात तुम्ही तपास यंत्रणांना कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तुमच्याकडे या प्रकरणातली थोडीशी माहिती होती तर ती पोलिसांना देणे तुम्हाला योग्य वाटले नाही का? तुम्ही दाखल केलेल्या याचिकेचा आधार काय? जनहित याचिकेला राजकीय हिताच्या याचिकेचे स्वरूप कसे दिले जाते, त्याचे हे उदाहरण आहे, असे सांगत न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळून लावली.

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडून सुनंदा पुष्कर मृत्यूच्या तपासात पोलिसांवर कोणताही दबाव आणला जातो आहे का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला तेव्हा पोलिसांनी आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला होता. २०१४ मध्ये झालेल्या या घटनेला तीन वर्षे लोटली आहेत. मात्र तपासातून अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती आलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court dismisses subramanian swamys petition in sunanda pushkar death case